
विदेशी श्वानांची ऐट
शिल्पा नरवडे, जुईनगर
आजच्या काळात श्वान पाळणे ही एक प्रकारची फॅशन झाली आहे. त्यात आजची पिढी परदेशी श्वानांच्या प्रजातींकडे वळलेली आहे. परदेशी प्रेमामध्ये आपला समाज हा देशी श्वान गमावत चालला आहे. आज श्वान पाळायचा म्हटले, तर सर्वांत आधी परदेशी कुत्र्यांच्या प्रजातींचा विचार केला जातो. निखळ दिसण्यावर आणि आनंदासाठी या श्वानांवर हजारो, लाखो रुपये खर्च करणारे श्वानप्रेमी पाहायला मिळतात.
श्वान म्हणजे निखळ आनंद देणारा, रक्षण करणारा, प्रामाणिक आणि जीव लावणारा प्राणी आहे. पूर्वीपासून घराचे राखण करण्यासाठी अनेक जण श्वान पाळतात; परंतु सद्यस्थितीत समाजात स्टेट्स वाढावा किंवा आवड म्हणून काही वर्षांमध्ये विदेशी श्वानांना अधिक पसंती मिळत आहे. दिमाखदार आणि देखणे श्वान मिळवण्यासाठी वाट्टेल तेवढे पैसेही मोजले जात आहेत. रक्षण करण्याचा प्रमुख धर्म असलेले श्वान लळा लागल्यानंतर श्वानप्रेमी त्यांच्यावर हजारो रुपये खर्च करतात. घरांमध्ये श्वान ठेवणे प्रतिष्ठेची बाब मानली जात असल्याने दिवसेंदिवस विविध देशी, विदेशी जातींचे कुत्रे बाळगणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
शहरी भागांमध्ये राहणाऱ्या अनेक व्यक्तींना घरातील एकटेपणा दूर करण्यासाठी, तर काही मुलांच्या हट्टापायी आणि काही स्त्रिया हौस म्हणून श्वान पाळतात. मग त्यासाठी हजारो, लाखो रुपयांचाही विचार न करता विदेशी श्वान खरेदी केले जातात. त्यामध्ये लॅब्रेडॉर, जर्मन शेफर्ड आणि रॉट व्हिलर यांना सर्वाधिक मागणी आहे. या श्वानांच्या चालण्या-फिरण्याचा डौल, त्यांचा लळा आणि स्वतंत्र बंगला पद्धतीतीत संरक्षणाच्या दृष्टिकोनातून त्यांचे महत्त्व विशेष ठरते. शहरात लॅब्रेडॉर, जर्मन शेफर्ड आणि रॉट व्हिलर या तीनही जातींच्या श्वानाला प्रचंड लोकप्रियता आहे. शहराचे एकूण राहणीमान उंचावल्यामुळे परदेशी जातींचे श्वान पाळले जात आहेत. श्वानांच्या सौंदर्य, वैशिष्ट्यांनुसार २५ हजारांपासून तब्बल अडीच ते पाच लाखांपर्यंत किमती आहेत. प्रत्येक श्वानांच्या आकारानुसार आणि जातीनुसार त्यांची किंमत ठरवली जाते.
डॉग शो, शर्यतीसाठीही श्वान पाळणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.
विशेष पेट शॉप्स
श्वानांसाठी पेडिग्री, ड्रल्स, युकनुबा, रॉयल कॅनिन, न्यूट्रिपेट अशा विविध देशी-विदेशी कंपन्यांचे प्रोटिनयुक्त खाद्य या श्वानांना द्यावे लागते. ते खाद्य नवी मुंबई शहरातील नेरूळ सेक्टर ७ येथे असलेल्या शॉप, क्लिनिक, सलूनमध्ये उपलब्ध आहे. सानपाडा, खारघर, बेलापूर आणि इतर विभागांमध्येही वेगवेगळे पेट शॉप्स उपलब्ध आहेत. याशिवाय त्यांच्या स्वच्छतेसाठी साबण, शाम्पू, ब्रश, साखळ्या, पिंजरे, बेल्ट, बेड, शूज, सॉक्स, विविध प्रकारचे कपडेही उपलब्ध आहेत.
जर्मन शेफर्ड
अल्सेशियन म्हणून ओळखली जाणारी ही श्वानांची जात. अत्यंत देखणी आणि दिलेले प्रशिक्षण आत्मसात करते. हा श्वान माणसाळला तर अत्यंत प्रेमळ आणि आक्रमक झाला, तर धोकादायक अशा दोन्ही प्रकारांमध्ये याला प्रशिक्षण दिले जाते. ८ ते १० हजारांपर्यंत याच्या किमती आहेत.
रॉट व्हिलर
रॉटविलर एक शूर, शक्तिशाली और बुद्धिमान श्वान आहे. याची मूळ जात जर्मन देशात आहे. प्रचंड आक्रमक असलेला हे श्वान पाहताक्षणी कोणालाही घाम फुटेल असा आहे. त्याची उंची साडेतीन, चार फूट असते.
लॅब्रेडॉर
कुटुंबात सहज मिसळणारे हे श्वान सर्वाधिक लोकप्रिय आहे. दिसायला राकट पण वृत्तीने प्रेमळ असतो. त्याची वास ओळखण्याची क्षमता अफाट आहे. त्यामुळे पोलिसांच्या पथकातही लॅब्रेडॉरला पसंती असते. ‘बोल राधा बोल’ आणि ‘तेरी महेरबानियाँ’सारख्या चित्रपटांतून लॅब्रेडॉर सर्वसामान्यांच्या पसंतीस उतरला. लॅब्रेडॉर साधारणत: ३० ते ४० हजारांदरम्यान मिळतो.
कॅन कोर्सो
कॅन कोर्सो दिसायलाच अत्यंत भीतिदायक असल्याने संशयास्पद कोणतीही व्यक्ती सहसा या श्वानांना आव्हान देत नाही. त्यांचा आहार इतर श्वानांच्या तुलनेत जास्त आहे. मजबूत शरीरयष्टी आणि कामगिरीसाठी वापरण्यात येत असल्याने त्यांना उत्तम दर्जाचा पोषक आहार आणि व्यायाम देणे गरजेचे असते.
आकारानुसार खाद्य
विदेशी श्वानांसाठी लागणारे खाद्य हे त्या श्वानांवर अवलंबून असते. ५०० रुपये किलोपासून ते १२०० रुपयांपर्यंत मिळते. लहान आकाराच्या श्वानांसाठी १ किलो खाद्य १० दिवस पुरते, तर मोठ्या आकाराच्या श्वानांसाठी १ किलो खाद्य २ दिवसात संपते. प्रत्येक श्वानाच्या आहारानुसार आणि त्याच्या प्रजातीनुसार त्याला दिवसाला खाद्य लागते.
अधिक मागणी असलेले श्वान
स्त्रियांना लहान आणि लांब केस असलेले श्वान जास्त प्रिय असते आणि ते आवडीने खरेदी करतात. त्यामुळे सिजुउ, माल्टिस, गोल्डन रेटरिव्हरला मागणी आहे. स्त्रिया २५ प्रकारच्या श्वानांच्या प्रजातींना पसंती दर्शवतात. पुरुषांना धष्ट पुष्ट आणि उंच श्वान आवडतात. त्यामध्ये लॅब्रॅडॉर, गोल्डन, बॉक्सर आणि सायबीरीयन हसकी श्वानांना पसंती दर्शवतात. सायबर्न या श्वानाला थंडगार वातावरण लागते. थंडगार वातावरणाशिवाय ते राहू शकत नाही.
लॅब्रेडॉर मादी पाळली आहे. आता ती तीन वर्षांची आहे. हा प्राणी खूप प्रामाणिक आहे. श्वानाकडून शारीरिक व्यायामासोबतच मानसिक व्यायाम करून घेऊन त्यांना तंदुरुस्त ठेवावे लागते. लहान पणापासून आवड असल्यामुळे श्वान पाळले आहे.
- शुभम माटे, श्वानप्रेमी
विदेशी श्वानांना प्रचंड प्रमाणात मागणी आहे. स्त्रिया छोट्या आणि केसाळ श्वानांना जास्त पसंती दर्शवतात. तर पुरुष हे धष्टपुष्ट आणि उंच श्वानांना पसंती दर्शवतात. नवी मुंबईमध्ये नेरूळ, सानपाडा, खारघर अशा अनेक ठिकाणी श्वानांना लागणारे खाद्य, हॉस्पिटल आणि सलून उपलब्ध आहे. अनेक श्वानप्रेमी त्याचा लाभ घेतात. या ठिकाणी पाहिजे ते श्वान उपलब्ध करून दिले जाते.
- वीपेश वेणू श्वान व्यवसायिक