
पेंग्विन सह आता महाकाय मगरी पहा :
काचेपलीकडून पाहा महाकाय मगरी
राणीच्या बागेत ‘क्रोकोडाईल वर्ल्ड’
किंवा
राणीच्या बागेत ‘क्रोकोडाईल वर्ल्ड’
काचेपलीकडून अनुभवता येणार महाकाय मगरींचे विश्व
सकाळ वृत्तसेवा ः मुंबई
परदेशी पेंग्विननंतर आता महाकाय, गूढ आणि तितक्याच आक्रमक असलेल्या मगरींचे विश्व आपल्याला अगदी जवळून अनुभवता येणार आहे. त्यासाठी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात (राणीबाग) ‘अंडर वॉटर व्ह्युइंग’ संकल्पना राबवण्यात येत असून त्याचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. आशिया खंडात असा पहिलाच प्रकल्प सुरू करण्यात येणार असून एप्रिलपासून प्राणीप्रेमींना त्याचा आनंद घेता येणार आहे.
राणीच्या बागेचे सध्या नूतनीकरण करण्यात येणार आहे. नूतनीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ‘अंडर वॉटर व्ह्युइंग’ संकल्पनेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात राणीबागेत मगर आणि सुसर यांचे उलगडणारे भावविश्व खास आकर्षण ठरणार आहे. त्यासाठी राणीबागेत चार हजार चौरस मीटर जागेवर ‘क्रोकोडाईल वर्ल्ड’ उभारण्यात येत आहे. सध्या त्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम महिनाभरात पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे २० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. ‘अंडर वॉटर व्ह्युइंग’मुळे एप्रिलपासून पर्यटकांना काचेपलीकडून महाकाय मगरींचे विश्व अनुभवता येणार आहे.
राणीबागेत सध्या पाच मगरी आणि दोन सुसर आहेत. नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने त्यांना क्वारंटाईन ठेवण्यात आले आहे. अतिरिक्त पाच मगरी आणि सुसर नव्याने आणण्याचा प्रयत्न आहे. चेन्नईच्या क्रोकोडाईल बँकेतून मगरी आणि ओरिसातील नंदनकानन झूमधून सुसर आणण्यात येणार आहेत. मगरींना पाहण्यासाठी अत्याधुनिक व्यवस्था नसल्याने त्या केवळ चिखलात किंवा गढूळ पाण्यात तरंगत असलेल्या दिसतात. अनेक मगरींचे वय झाल्याने त्या सुस्त पडलेल्या होत्या. त्यामुळे त्यांचा अधिक आनंद पर्यटकांना घेता येत नव्हता.
आशिया खंडात पहिलाच प्रयोग
आशिया खंडात पहिल्यांदाच राणीबागेत मगरी पाहण्यासाठी ‘अंडर वॉटर व्ह्युइंग’ संकल्पना राबवण्यात येत आहे. त्यासाठी ‘क्रोकोडाईल वर्ल्ड’चे दोन भाग करण्यात आले आहेत. एका बाजूला पाणी आणि दुसरीकडे भूभाग ठेवण्यात आला आहे. पाण्यात मगरी पोहण्याचा मनमुराद आनंद लुटतील. दुसऱ्या बाजूला नैसर्गिक अधिवास म्हणजेच वाळू, माती, पाण्याची छोटी डबकी आणि काही भागांत झाडे अशा प्रकारे पिंजरा सज्ज करण्यात येत आहे.
‘डेक व्ह्युइंग’चीही व्यवस्था
‘क्रोकोडाईल वर्ल्ड’मध्ये ‘डेक व्ह्युइंग’ची व्यवस्थाही असणार आहे. पाण्याखालील मगरींचा आनंद घेतल्यानंतर पर्यटकांना उंचावरील डेकवर जाता येणार आहे. त्यासाठी खास शिड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. डेकवरून पर्यटकाना संपूर्ण ‘क्रोकोडाईल वर्ल्ड’ पाहता येणार आहे. त्यामुळे मगरीचा पाण्याखालील आणि भूभागावरील वावर अनुभवता येणार आहे.
काही प्राणिसंग्रहालयांना पत्र लिहून त्यांच्याकडून मगर आणि सुसर देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे अतिरिक्त मगरी उपलब्ध होणार आहेत. पेंग्विन, वाघ आणि बिबट्यांसह मगरी उपलब्ध झाल्यानंतर राणीच्या बागेत पर्यटकांची संख्या आणि महसूल वाढणार आहे.
- डॉ. संजय त्रिपाठी, संचालक