
ग्रामीण भागात कायद्याची जनजागृती गरजेची
वसई, ता. १२ (बातमीदार) : पोलिस ठाण्यात येणाऱ्या कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात सासू आणि नणंद यांच्याविरुद्धच तक्रारी जास्त असतात. ग्रामीण भागातील महिलांपर्यंत कायदा आणि त्यांच्या न्याय्य हक्कांबाबतची जागृती झाली पाहिजे; जेणेकरून त्यांना सुरक्षिततेचे मार्ग सोपे होतील, असे प्रतिपादन मिरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालयाच्या सहायक पोलिस आयुक्त पद्मजा बडे यांनी जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात केले.
ख्रिस्तीना घोन्सालविस फाऊंडेशनतर्फे बंगली नाका येथील लोकसेवा मंडळ सभागृहात महिला पोलिसांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून सहायक पोलिस आयुक्त पद्मजा बडे; तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार डॉमनिक घोन्सालवीस, फादर थॉमस लोपीस, जनआंदोलनाच्या नेत्या डॉमनिका डाबरे, कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटलच्या माजी अध्यक्षा इव्हेंट कुटिन्हो व अन्य मान्यवर उपस्थित होते. ज्याला आई जिजाऊ कळली तो शिवबा झाला, ज्याला बहीण मुक्ताई कळली तो ज्ञानोबा झाला, ज्याला सखी राधा कळली तो शाम झाला, ज्याला पत्नी सीता कळली तो राम झाला, असेही पद्मजा बडे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहन घोन्सालवीस यांनी केले; तर सूत्रसंचालन ब्रिनल डायस यांनी केले. उपस्थितांचे आभार रेखा घोन्सालवीस यांनी मानले.