
मालमत्ता कराविरोधात आज जनआक्रोश
कामोठे, ता. १२ (बातमीदार) : पनवेल महापालिकेने लादलेल्या मालमत्ता कराविरोधात नागरिकांच्या मनामध्ये असंतोषाचे वातावरण आहे. त्यामुळे पनवेल महापालिका मुख्यालयावर सोमवारी (ता. १३) काढण्यात येणाऱ्या जनआक्रोश मोर्चातील नागरिकांच्या सहभागासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली असून मोर्चात लक्षवेधी घोषणा देणाऱ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पूर्णाकृती पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होणार आहे. शहरातील मुख्य ठिकाणावरून दुपारी महापालिका मुख्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे. या मोर्चात ग्रामीण भागातील नागरिकांसह नवीन पनवेल, खांदा वसाहत, कामोठे, कळंबोली, खारघर शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी महाविकास आघाडीकडून विविध प्रकारे जनजागृती केली जात आहे. शिवाय मोर्चा यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महापालिका, तत्कालीन सत्ताधाऱ्यांविरोधात वातावरण निर्मितीसाठी बैठकांचाही जोर लावला आहे.
-------------------------------------------
महापालिका शहरी आणि ग्रामीण यांच्यामध्ये भेदभाव करत आहे. त्यामुळे मालमत्ता कर रद्द झाला पाहिजे. कामोठे नोडमधील नागरिक मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक आहेत. मोर्चामध्ये लक्षवेधी घोषणा देणाऱ्या नागरिकांचा सन्मान करणार आहे.
- अमोल शितोळे, शेकाप अध्यक्ष, कामोठे