वाहतूक व्यवस्थेला बळकटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहतूक व्यवस्थेला बळकटी
वाहतूक व्यवस्थेला बळकटी

वाहतूक व्यवस्थेला बळकटी

sakal_logo
By

प्रसाद जोशी : सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. १२ : पालघर जिल्ह्यात सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने राज्‍याच्‍या अर्थसंकल्पात विविध तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागाला मोठ्या सुविधा मिळणार आहेत. जिल्‍ह्यातील वाहतूक व्यवस्थेला गती देण्‍याबरोबरच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय साकारण्‍यासाठी विशेष तरतूद करण्‍यात आली आहे. गेली अनेक वर्षे जिल्‍ह्यावर विशेष लक्ष असणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्‍यावरही जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केल्‍याचे दिसत आहे.

पालघर जिल्ह्याचा विकास व्हावा म्हणून सरकारने महत्त्‍वाकांक्षी प्रकल्पांसाठी कोट्यवधींची तरतूद केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विकासाला हातभार लागणार आहे. दळणवळणाची व्यवस्था सुधारल्याने वसई, बोईसर औद्योगिक वसाहतीला मोठा फायदा होणार असून, यामुळे स्थानिक नागरिकांना वाहतुकीचा होणारा त्रास कमी होणार आहे. त्‍याचबरोबर पाणी प्रकल्पासाठीही भरीव निधी असल्याने भविष्यात पाण्याची चिंता दूर होणार आहे.
------------------------------
हिरवा कंदील...
विरार-अलिबाग मल्‍टिमॉडेल कॉरिडॉर, ठाणे, वसई जलवाहतूक, वर्सोवा-विरार सी-लिंक व पालघर जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय हे चार महत्त्‍वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होण्यासाठी हिरवा कंदील मिळाला आहे.

जिल्ह्यातील बुलेट ट्रेनसोबत नवे प्रकल्प गतिमान होण्‍याचे संकेत मिळत आहेत. वर्सोवा ते विरार सागरी सेतू हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हा प्रकल्प एमएमआरडीएकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.

सागरी सेतूमुळे वर्सोवा ते विरार हे अंतर केवळ ४५ मिनिटांत पार करता येणार आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कोंडीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी नव्याने पुलाची निर्मिती केली जात आहे.

मुंबई ते गुजरात मार्ग जोडला गेल्याने ही सेवाही अपुरी असणार आहे. तसेच लोकलने प्रवास करणेदेखील प्रचंड गर्दीमुळे जिकीरीचे होत असताना वर्सोवा, विरार सागरी सेतू प्रकल्प हा अनेकदृष्‍ट्या फायदेशीर ठरणारा आहे.
--------------------------------------------
स्थानिकांना रोजगाराची संधी
मार्गावर जलवाहतुकीची सेवा उपलब्ध करून दिल्यास वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. तसेच मुंबई, ठाणे व आजूबाजूच्या परिसरातून येणाऱ्या पर्यटकांना व नागरिकांना याचा फायदा होऊ शकतो. विशेषतः स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते.
-----------------------
१२६ किलोमीटरचा कॉरिडॉर
विरार-अलिबाग हा १२६ किलोमीटरचा कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे दळणवळणाचे हे उत्तम साधन नागरिकांना उपलब्ध होणार असून यामुळे रायगड, ठाणे, पालघर व अलिबाग या जिल्ह्याला नवी सुविधा मिळणार आहे.
--------------------------------
जलवाहतुकीसाठी ४२४ कोटी
ठाणे-वसई खाडी जलवाहतुकीने जोडण्यासाठी एकूण ४२४ कोटी रुपये खर्च होणार आहेत. वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, तसेच आमदार क्षितिज ठाकूर यांनी रो-रो सेवा, जलवाहतुकीसाठी सरकारकडे पाठपुरावा केला होता. जेणेकरून येथील नागरिकांना प्रवास करण्यासाठी उत्तम मार्ग मिळेल.
------------------
जिल्‍ह्यातील प्रकल्‍पांना चालना
विरार-अलिबाग मल्टी कॉरिडॉर
ठाणे-वसई जलवाहतूक
वर्सोवा-विरार सागरी सेतू- १५०० कोटी
पालघर वैद्यकीय महाविद्यालय
सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना- २४९ कोटी
पालघर जिल्हा वाहतूक कोंडी फोडण्यासाठी- ४४८ कोटींची विकासकामे
देहर्जी प्रकल्प- २५ कोटी