
तडीपार आरोपीला ऐरोलीतून अटक
नवी मुंबई, ता. १२ (वार्ताहर) : मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार केलेल्या आरोपीला ऐरोली, सेक्टर-९ मधील दिवा नाका सर्कल येथून रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. अजय भोसले (२३) या आरोपीचे नाव असून जानेवारी महिन्यातदेखील विनापरवानगी ऐरोलीत आला असताना त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती.
दिघा भागातील विष्णुनगर इलटणपाडा येथे राहणारा अजय भोसले याच्याविरोधात रबाळे, एमआयडीसी, कळवा पोलिस ठाण्यात मारामारी, चोरी, बेकायदा शस्र बाळगणे, धमकावणे यासह इतर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांकडून अजय भोसले याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहून हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला होता. त्यानंतर परिमंडळ-१च्या पोलिस उप-आयुक्तांनी डिसेंबर-२०२२ मध्ये त्याला मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार केले होते. मात्र, आरोपी अजय भोसले महिन्याभरातच नवी मुंबईत ऐरोली दिवा नाका येथे आला होता. त्यावेळी रबाळे पोलिसांना त्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला दिवा नाका येथे त्याला पकडण्यात आले होते. तसेच त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून हद्दीच्या बाहेर रवानगी केली होती.
-------------------------------------
दुसऱ्यांदा कायद्याचे उंल्लघन
अजय भोसले कोणतीही पूर्वपरवानगी न घेता ८ मार्च रोजी पुन्हा ऐरोलीमध्ये दाखल झाला होता. त्यामुळे रबाळे पोलिसांनी त्याला दिवा नाका येथून पकडले आहे. तसेच हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे त्याच्या विरोधात मुंबई पोलिस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.