
नशामुक्त गोवंडी मानखुर्दसाठी सामाजिक संस्था एकत्र
मानखुर्द, ता. १३ (बातमीदार) ः नशामुक्तीसाठी गोवंडीमध्ये २१ सामाजिक संस्था एकत्र आल्या आहेत. शिवाजीनगर येथील गीता विकास विद्यालयाशेजारील समाज कल्याण हॉलमध्ये या संस्थांच्या सहभागातून व्यसनाधीनता व मुलांची मानसिक स्थिती या विषयावर नुकतेच कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सामाजिक कार्यकर्त्या सविता कुऱ्हाडे, महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळाचे सचिव अमोल मडांबे तसेच मानखुर्द पोलिस ठाण्यातील कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी या संस्थांच्या सदस्यांशी संवाद साधला. व्यसनाधीनता रोखण्यासाठी सामाजिक संस्थांचे परिसरात जाळे निर्माण करून जास्तीत जास्त प्रमाणात जनजागृती करण्याचा निर्धार व नशामुक्त एम पूर्व विभाग ही मोहीम राबवण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. ही मोहीम चाईल्ड राईट्स अँड यू म्हणजेच क्रायच्या आर्थिक मदतीने चालवली जात असल्याची माहिती जनजागृती विद्यार्थी संघटनेचे सचिव संतोष सुर्वे यांनी दिली.