
Vegetable Rate : कडक उन्हामुळे भाज्यांची दरवाढ
वाशी : उन्हाळा सुरू होताच भाज्यांच्या दरवाढीला सुरुवात होते. वाशीतील एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजारावरदेखील कडक उन्हाचा परिणाम जाणवू लागला असून भाज्यांची मागणी अधिक असताना कमी पुरवठा होत असल्याने दरवाढ होण्यास सुरुवात झाली आहे.
त्यामुळे घाऊक बाजारात वटाणा, भेंडी, शिमला मिरची आणि गवारची दरवाढ झाली आहे; तर कोबी, फ्लॉवर स्वस्त झाला आहे. हिवाळ्यात भाज्यांचे उत्पादन अधिक असते. त्यामुळे थंडीमध्ये बाजारात भाजीपाल्याच्या जवळजवळ ५५० ते ६०० गाड्या दाखल होत होत्या.
आता मात्र उन्हाळा सुरू होताच भाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे सध्या बाजारात फक्त ३०० गाड्यांची आवक होत आहे. उन्हाळ्यात भाज्यांचे उत्पादन कमी होत असल्याचा हा परिणाम असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
त्यामुळे दोन महिन्यांच्या तुलनेत भेंडी, शिमला मिरची, फरसबी, गवार, ढोबळी मिरचीच्या दरात अधिक वाढ झाली आहे. त्याचबरोबर फ्लॅावर, भेंडी पाच रुपये, फरसबी, टॉमेटो, शेवगा, कोथिंबिरीच्या दरांमध्येदेखील चढ-उतार पाहावयास मिळत आहे.
शेवग्याची शेंग सर्वांत स्वस्त
ढोबळी मिरची सहा रुपयांनी; तर गवारच्या दरांमध्ये दहा रुपयांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे कोथिंबीर, मेथीच्या दरात चार रुपयांनी घट झाली आहे; तर शेवग्याची शेंग ही २० रुपयांनी स्वस्त झाली आहे.
उन्हाळ्यात भाज्यांची दरवाढ होते. कडक उन्हाने भाज्यांचे उत्पादन कमी येते. त्यामुळे आवक घटल्याने परिणामी भाज्या महाग होण्यास सुरुवात होते. साधारण पावसाळ्यापर्यंत अशीच परिस्थिती राहण्याची चिन्हे आहेत.
- के. डी. भाळके, घाऊक भाजीपाला व्यापारी
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती घाऊक बाजार दर किलोमागे
भाजी - ११ मार्च - ११ जानेवारी
कोथिंबीर - १४ ते १५ - १८ ते २०
मेथी - १४ ते १५ - १० ते १२
पालक - ५ ते ८ - ५ ते ८
शेपू - ७ ते १४ - ७ ते १५
कोबी - ६ ते ९ - ६ ते ९
गवार - ५० ते ८० - ४० ते ६५
फ्लावर - १० ते १४ - ८ ते १०
भेंडी - ४० ते ५० - ३५ ते ४५
फरसबी - ३० ते ४४ - १५ ते २५
चवळी शेंगा - ३० ते ३५ - २५ ते ३५
टोमॅटो - १४ ते १८ - ८ ते १०
शेवगा शेंग - ४० ते ६० - ६० ते ९०
ढोबळी मिरची - २६ ते ४४ - २० ते २८