
एसटीच्या तिजोरीत दिवसाला २४ कोटी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : कोरोना महामारी, संपामुळे उत्पन्नावर विपरीत परिणाम झाल्याने एसटी महामंडळ बंद पडणार, खासगीकरणात जाणार, असे प्रश्न उपस्थित होत असताना, एसटी पुन्हा सुसाट धावत असून भरघोस उत्पन्नवाढीला सुरुवात झाली आहे. योग्य नियोजनामुळे १३ हजार बसच्या भरवशावर दिवसाला सरासरी २४ कोटींचे उत्पन्न प्राप्त होत असून, सुमारे ५२ लाख प्रवासी राज्यभरात एसटीने प्रवास करत आहेत. एसटी बसची संख्या वाढल्यास उत्पन्न सुमारे २८ कोटींपेक्षा पुढे जाण्याची शक्यता आहे.
सामान्य परिस्थितीत कोरोना महामारीपूर्वी १८ हजार बस आणि सुमारे ६५ लाख प्रवासी आणि २४ कोटींचे दैनंदिन उत्पन्न होते. मात्र, कोरोना त्यानंतर संपामुळे एसटीची प्रवासी सेवा ठप्प झाली होती. त्याशिवाय बस एकाच ठिकाणी उभ्या राहिल्याने नादुरुस्तीचे प्रमाण वाढले, बस कालबाह्य झाल्या, संपामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. संघटनांच्या गटबाजीमुळे एसटीचे हाल झाले, अशा परिस्थितीतही एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सहकारी अधिकाऱ्यांसह एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी योग्य नियोजन आखून पुन्हा एसटीला उभारी देण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येत आहे.
प्रवासी, उत्पन्नवाढीसाठी काम
शेखर चन्ने सध्या राज्याच्या दौऱ्यावर असून, प्रत्येक विभागाची आढावा बैठक आयोजित करून संबंधित विभागातील बस, प्रवासी, कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या समस्या, नियोजन, वर्षभरातील कामाच्या अहवालाची तपासणी करत आहेत. प्रवासी आणि उत्पन्नवाढीच्या दृष्टीने काम केले जात आहे. ११ मार्च नागपूर विभाग, १२ मार्च अमरावती विभागाचा आढावा घेतला असून, १८ मार्च पुणे, २५ मार्च नाशिक आणि २८ मार्च औरंगाबाद विभागाचा आढावा त्यांच्या उपस्थित घेतला जाणार आहे.
येत्या एक वर्षात एसटी पुन्हा कात टाकणार, यात शंका नाही. अधिकारी, कर्मचारी, मुख्यत: चालक, वाहक उत्साहाने काम करत असल्याने एसटी महामंडळ लवकरच पुन्हा एकदा उभारी घेणार आहे.
- शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ