
महाराष्ट्रातील निर्जन घरांना चित्रांतून आदरांजली
मुंबई, ता. १३ ः अनेक पुरस्कारांच्या मानकरी असणाऱ्या नंदिता देसाई या कलाप्रेमींना ‘नॉस्टॅल्जिक सहलीचा’ आनंद देत आहेत. ‘द स्टोन अँड द ब्रिक’ या नावाचे चित्र प्रदर्शन १९ मार्चपर्यंत काला घोडा येथील प्रतिष्ठित जहांगीर आर्ट गॅलरी येथे सुरू आहे.
‘घरे’ या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावरील अंदाजे २५ चित्रे प्रदर्शित केली जात आहेत. घराचे महत्त्व कॅन्व्हासवर चित्रित करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवनातून प्रेरणा घेतली असून हे प्रदर्शन साकारण्यासाठी त्यांना सहा महिन्यांचा कालावधी लागला. त्या म्हणतात, ‘मी माझ्या आयुष्यात डझनभर विविध घरांत राहिले आहे आणि प्रत्येक घराने माझ्या सुप्त मनावर त्याची छाप पाडली आहे.’ विशेष म्हणजे त्यांच्या कलाकृतीत दाखवण्यात आलेली बहुतांश घरे ही मोडकळीस आलेली किंवा निर्जन आहेत. ‘माझ्यासाठी घरे म्हणजे आठवणी, भावना, गतस्मृती आणि आपुलकी अशा विविध गोष्टींचे मिश्रण आहे. भरपूर सावली देणारी अशी घराची अंतर्गत रचना हे माझ्यासाठी सौंदर्य आहे. कालातीतपणाची भावना खूप जुन्या, पडक्या घरांमध्ये, शहरांमध्ये आणि वास्तूंमध्ये जन्मजात असते. जेव्हा मी ओरहान पामुक यांचे ‘इस्तंबूल’ हे पुस्तक वाचले, तेव्हा या विचारांना त्यांची वाचा फुटली. माझी चित्रे ही त्यांच्या ‘ह्युजन’ या सखोल तात्त्विक संकल्पनेने प्रेरित आहेत. ही संकल्पना म्हणजे भूतकाळाची, स्मरणरंजनाची, सौंदर्याची, इतिहासाची अमूर्त भावना असून त्याला थोडीशी दुःखाची किनार आहे,’ असेही त्या म्हणतात.
सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही, की या कार्यक्रमातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग मेक-अ-विश फाऊंडेशन ऑफ इंडिया यांना दिला जाणार आहे. मेक-अ-विश फाऊंडेशन ऑफ इंडिया हा सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे. वय वर्षे तीन ते अठरा या वयोगटातील जी मुले वैद्यकीय समस्यांनी ग्रस्त आहेत; अशांना विविध उपक्रमांतून आशा, आनंद आणि बळ देऊन त्यांचे अनुभवविश्व समृद्ध करण्याचा हा ट्रस्ट प्रयत्न करतो.