
वसई-विरार पालिका मुख्यालयाचे लवकरच उद्घाटन
वसई, ता. १४ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेत कर्मचारी भरती, परिवहन सेवेत सुधार तसेच शासकीय अधिकारी वाढत आहेत; मात्र विरार पूर्वेला असणाऱ्या जुन्या इमारत मुख्यालयात कामकाज करताना येणाऱ्या अडचणी पाहता नवीन प्रशस्त व अद्ययावत सुविधा असलेल्या मुख्यालयाची निर्मिती विरार पश्चिम यशवंतनगर या ठिकाणी करण्यात आली आहे. यासाठी अंदाजे १०९ कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे. येत्या एप्रिल महिन्यात प्रशासकीय राजवटीत लवकरच या मुख्यालयाचे उद्घाटन होणार आहे.
महापालिकेची स्थापना २००९ मध्ये झाली. आजतागायत जुन्या जीर्ण अवस्थेतील इमारतीतून मुख्यालयाचा कारभार सुरू आहे. या ठिकाणी पावसाळ्यात गळती तसेच रस्त्यालगत कोंडी व अन्य समस्या भेडसावतात. या ठिकाणी दालनाचीदेखील व्यवस्था अपुरी आहे. काही वर्षांपूर्वी कार्यालयात वाळवीदेखील लागली होती. त्यामुळे जुन्या दस्तऐवजाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. लोकप्रतिनिधी, अधिकारी आदींना बसण्यासाठीदेखील जागेचा अभाव निर्माण होतो. त्यामुळे २०१७ मध्ये विरार पश्चिम यशवंत नगर येथे नवीन इमारतीचा प्रस्ताव मांडण्यात आला. महिला महापौर प्रवीणा ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. काही काळातच कामाला सुरुवात करण्यात आली; परंतु, यात कोरोनाने २ वर्ष खंड पाडला.
----------------------------
लवकरच ‘मुहूर्त’ ठरणार
एकूण १०९ कोटी रुपये या मुख्यालयासाठी खर्च होणार असून, सात मजली इमारत उभी रहाणार आहे. याठिकाणी भव्य सभागृह, पत्रकार कक्ष, कँटीन, अधिकाऱ्यांना व येत्या काळात निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधी व सभापतींना दालन निर्मिती करण्यात आली आहे. पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर परिवहन विभागाचे कार्यालय असणार आहे. याठिकाणी अद्याप वीज पुरवठ्याचे काम पूर्ण झालेले नाही. तसेच काही छोटी कामे शिल्लक आहेत, ती पूर्ण झाल्यावर या मुख्यालयाच्या उद्घाटनाची तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे.
---------------------
कोट
विरार पश्चिम येथे वसई-विरार महापालिकेच्या मुख्यालयाची सात मजल्याची इमारत असेल. याचे काम पूर्णत्वास आले आहे. लवकरच या इमारतीत प्रशासकीय कारभार सुरू होईल.
- राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता
----------------------
भरती प्रक्रिया होणार
लवकरच वसई-विरार महापालिकेत भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे मनुष्यबळात वाढ होणार असून, नव्या मुख्यालयात प्रशासकीय कामकाज सुरू झाल्यास कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना दिलासा मिळेल. एप्रिल महिन्यात या मुख्यालयाचे दार उघडणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून मिळत आहेत.
---------------------
आयुक्तांची पाहणी
वसई-विरार शहर महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी नव्या मुख्यालयाची पाहणीदेखील दोन दिवसांपूर्वी केली. कामाचा आढावा घेऊन सूचनाही केल्या आहेत.
---------------------
वसई : विरार पश्चिम येथे उभारण्यात आलेले महापालिकेचे नवे मुख्यालय.