
दिवशी गावात बाटली आडवी
कासा, ता. १३ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील दुर्गम भागातील दिवशी, गडचिंचले येथील ग्रामपंचायतीमध्ये सोमवारी (ता. १३) ग्रामसभा घेण्यात आली. यात मुख्यतः दारूबंदीचा ठराव घेऊन तो बहुमताने पास करण्यात आला. या वेळी दिवशीचे सरपंच जयेश मोहनकर, उपसरपंच सचिन सावर, ग्रामविकास अधिकारी चंदू डोंगरकर, कासा पोलिस अधिकारी श्रीकांत शिंदे, जिल्हा परिषद शिक्षक, आशा वर्कर, तंटामुक्त अध्यक्ष, वन हक्क समिती सदस्य, विविध बचतगट सदस्य, महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
दिवशी, गडचिंचले ग्रामसभेत ग्रामविकास अधिकारी चंदू डोंगरकर यांनी अनेक विषय मांडले. यात सुरुवातीला मागील ग्रामसभेचे इतिवृत्त वाचून कायम केले. शासन परिपत्रकाचे वाचन, विविध योजनेच्या लाभार्थ्यांची निवड, विकासकामे, वनहक्क समितीचे दावे मंजूर करणे तसेच ग्रामपंचायतीच्या विविध समित्या स्थापन करणे या विषयावर चर्चा करून उपाययोजना करण्यात आल्या. मुख्य म्हणजे दिवशी, गडचिंचले या गावांमध्ये मागे घडलेल्या साधू हत्याकांडाने येथील नागरिकांच्या जनजीवनावर मोठा परिणाम झाला होता. या गावच्या नागरिकांना या घटनेबद्दल खुप दुःख सोसावे लागले होते. मागील घटना ही गैरसमजातून घडली की अन्य प्रकाराने हा विचार बाजूला ठेऊन यापेक्षा पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी सर्व ग्रामस्थांनी या ग्रामसभेत दारूबंदीचा निर्णय घेऊन अमलात आणला व सर्वांनी तो गावात राबवण्याचा निर्णय घेतला.
-------------------
... तर गावाच्या प्रगतीचा आलेख उंचावेल
दारूबंदीच्या निर्णयासाठी पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सुरू केलेल्या जनसंवाद मोहिमेअंतर्गत कासा पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस अधिकारी श्रीकांत शिंदे यांनी सहकार्य केले. या ग्रामसभेमध्ये ते स्वतः येऊन मार्गदर्शन करताना म्हणाले, साधू हत्याकांडाच्या घटनेमुळे येथील नागरिकांच्या जीवनामध्ये मोठा परिणाम घडलेला आहे. पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी नागरिकांनी व्यसनमुक्ती, दारूबंदी त्याचप्रमाणे आत्महत्येचे प्रमाण कमी केले पाहिजे, साक्षरतेचा प्रसार वाढवला पाहिजे. अनेक योजनांचा फायदा घेऊन आपली प्रगती केली पाहिजे. दारूबंदीचा ठराव केल्याने स्वतःच्या तसेच गावच्या प्रगतीचा आलेख उंचावेल.