ज्ञानप्रकाश विद्यालयाचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्ञानप्रकाश विद्यालयाचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा
ज्ञानप्रकाश विद्यालयाचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा

ज्ञानप्रकाश विद्यालयाचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा

sakal_logo
By

घाटकोपर, ता. १४ (बातमीदार) ः घाटकोपर पश्चिम येथील वत्सलाबाई दत्तात्रय चॅरिटेबल ट्रस्ट संचालित ज्ञानप्रकाश विद्यालयाच्‍या प्राथमिक विभागाचा वार्षिक बक्षीस वितरण व विद्यार्थी गुणगौरव सोहळा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डी. एन. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. ज्ञानप्रकाश विद्यालय प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विजया सैद यांनी विद्यार्थ्यांमध्ये विविध मूल्ये व जीवनकौशल्य यांची रूजवण व्हावी तसेच त्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक व सामाजिक विकास व्हावा या हेतूने शाळेत वर्षभर शालेय अभ्यासक्रमाबरोबर विविध प्रकारच्या २० स्पर्धा व विविध उपक्रम कौशल्यपूर्ण नियोजन करून राबविले. त्यांचे महत्व कार्यक्रमात उपस्थितांसमोर प्रास्ताविकात मांडले. गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील शैक्षणिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
एकूण १४४ बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचा व ३५ बक्षीसपात्र पालकांचा प्रशस्तिपत्रक तसेच पालकांनी व शिक्षकांनी स्वतः बनवलेले पुष्पगुच्छ आणि शालेय उपयोगी साहित्य देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याप्रसंगी पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रतिभा फेगडे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नीलिमा टेकाडे, स्नेहा सुभेदार, अभिजीत नागमल, प्रतिभा बाभरे, सुलभा चौधरी, सोनाली दळवी, शालेय व्यवस्थापन समिती तसेच शिक्षक पालक संघ समिती सदस्य, पूर्वप्राथमिक विभाग शिक्षकवृंद आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक विभागाच्या सहशिक्षिका स्मिता क्षीरसागर यांनी केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सावंत यांचे मार्गदर्शन, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विजया सैद, प्राथमिक विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अथक परिश्रमाने कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.