महामार्गावर जीपमधील प्रवाशांची लूटमार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महामार्गावर जीपमधील प्रवाशांची लूटमार
महामार्गावर जीपमधील प्रवाशांची लूटमार

महामार्गावर जीपमधील प्रवाशांची लूटमार

sakal_logo
By

पेण, ता. १३ (वार्ताहर) : तालुक्यातील आंबिवली येथे मुंबई-गोवा महामार्गावरून आज (ता. १३) पहाटेच्या वेळी मुंबईच्या दिशेने जीपमधून जाणाऱ्या प्रवाशांना मारझोड करत लूटमार करण्यात आली. या लूटमारीत प्रवाशांचे साडेचार लाखांचे दागिने चोरत अज्ञात तरुण पसार झाले. याप्रकरणी पेण दादर सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरून जीप क्र. एमएच ०६ एझेड १४५१ मधून एका कुटुंबातील सहा जण दापोलीवरून बोरिवली मुंबईकडे प्रवास करत होते. त्यांचे वाहन आंबिवली फाट्यानजीक असणाऱ्या हॉटेल साई सहारा येथे आज पहाटे पावणेतीन वाजण्याच्या सुमारास आले असता एका कारमधून आलेल्या तरुणांनी त्यांच्या जीपच्या काचेवर दोन दगड मारून त्यांना शिवीगाळ केली. यादरम्यान, घाबरलेल्या चालकाने गाडी पुढे नेली असता समोरून तीन वाहनांतून आलेल्या जवळपास १२ ते १५ तरुणांनी त्यांना अडवून मारझोड, शिवीगाळ करून जीपमधील प्रवाशांच्या अंगावरील सुमारे चार लाख ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने खेचून पळ काढला.

जीपमधील घाबरलेल्या प्रवाशांनी पनवेल गाठत स्थानिक पोलिसांना घडलेली हकिगत सांगितली. पोलिसांनी शोध घेतला असता संशयित आरोपी पळून गेल्याचे समोर आले. याप्रकरणी पेण दादर सागरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अजित गोळे करत आहेत.

प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
मुंबई-गोवा महामार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते; मात्र रात्रीच्या वेळी वाहनांवर दगडफेक करत त्यांची लूटमार करण्याची घटना घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी चालकांकडून करण्यात येत आहे.