
जंगलेश्वर मंदिर मार्गातील मोकळ्या भूखंडाचे रक्षण
घाटकोपर, ता. १४ (बातमीदार) ः चांदीवली विधानसभा क्षेत्रातील जंगलेश्वर महादेव मंदिर मार्ग येथील शीतल नगरमधील महापालिका जलअभियंता विभागाची जागा लवकरच मुक्त होणार आहे. यासंदर्भात माजी नगरसेवक प्रकाश मोरे यांनी पालिकेच्या बैठकीत हरकतीचा मुद्दा उपस्थित करून मैदान सुरक्षित करण्याकडे लक्ष वेधले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून पालिकेने ही जमीन अतिक्रमणमुक्त करण्यासाठी तसेच येथील राडारोडा हटवून त्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यासाठी ६३ लाखांचा खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.
कुर्ला एल विभागाच्या कार्यक्षेत्रातील महापालिका जलअभियंता विभागाच्या अखत्यारीत असलेल्या भूखंडावर राडारोडा, डेब्रिज, माती तसेच मलबा टाकून अतिक्रमण केले जात होते. या जागेवर जलाशयाचे आरक्षण असून या जागेची रेखाचित्रे सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना माजी नगरसेवक प्रकाश मोरे यांनी सांगितले, की हा भूखंड सुरक्षित राहावा यासाठी पालिकेच्या संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. पालिकेच्या बैठकीत याबाबत मुद्दा उपस्थित करून लक्ष वेधले होते त्याचेच हे यश आहे. आता या आरक्षित भूखंडावरील सध्याचे अतिक्रमण हटवल्यानंतर महापालिका या ठिकाणी संरक्षक भिंत बांधणार आहे. तसेच या जागेचे सीमांकन करून भूखंडाच्या परिसरात तारेचे कुंपण बांधले जाणार असल्याचे मोरे यांनी सांगितले.