
‘महालक्ष्मी सरस’मध्ये चोरांचा सुळसुळाट
जुईनगर (बातमीदार) : सिडको प्रदर्शनी केंद्रात महालक्ष्मी सरस प्रदर्शनाच्या निमित्ताने आलेल्या छोट्या व्यावसायिकांना चोरट्यांचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागातून आलेल्या व्यावसायिकांची वाहवा होत असली, तरी चोरीचा फटका बसत आहे. याप्रकरणी पुढे काय करावे, हे त्यांना सुचत नाही. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे आणि महिलांच्या शिष्टमंडळाने कोकण विभागीय आयुक्तांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले.
दोन दिवसांपूर्वी लातूर येथील महिलेचे १५ हजार रुपये चोरीला गेल्यावर महिला हवालदिल झाली होती; मात्र त्याची दखल तात्काळ घेतल्याने सीसी टीव्ही पाहून चोरट्यास पकडले आणि त्याच्याकडून पैसेही वसूल केले; मात्र या प्रकरणात महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास नकार दिला होता. असाच प्रकार पंजाबमधून आलेल्या एका महिलेसोबत घडला असून तिचे साडेनऊ हजार लंपास केल्याची घटना घडली होती.