
डॉक्टर क्रिकेट स्पर्धेत वसई संघ विजयी
विरार, ता. १४ (बातमीदार) : नालासोपारा मेडिकल असोसिएशनने आंतरजिल्हा डॉक्टर ओव्हरआम क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले होते. या स्पर्धा नालासोपारा श्रीपस्था येथील क्रीडांगणावर पार पडल्या. स्पर्धेमध्ये नालासोपारा संघाव्यतिरिक्त डहाणू, भिवंडी, नवी मुंबई, ठाणे, ऐरोली, विरार, वसई, वाडा येथील डॉक्टर संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत पुरुषांच्या गटात वसई संघ विजेता ठरला; तर महिलांच्या गटात नालासोपारा संघ विजयी झाला. दिवसभराच्या साखळी पद्धतीने खेळवण्यात आलेल्या सामन्यामध्ये अंतिम सामना ऐरोली विरुद्ध वसई या संघामध्ये झाला. या रोमहर्षक लढतीत वसई संघाने विजेतेपद पटकावले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. सचिन पाटील आणि डॉ. सचिन भिरुड यांनी मेहनत घेतली. डॉ. सुरेश पाटील, डॉ. सूरज गायकवाड, डॉ. मनोज खडसे, डॉ. संदीप चौधरी, डॉ. निलेश वानखेडे यांनी मार्गदर्शन केले.