पेणमध्ये शासकीय कामकाज ठप्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेणमध्ये शासकीय कामकाज ठप्प
पेणमध्ये शासकीय कामकाज ठप्प

पेणमध्ये शासकीय कामकाज ठप्प

sakal_logo
By

पेण, ता.१४ (वार्ताहर): सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे, या मागणीसाठी पुकारलेल्या बेमुदत संपाला पेणमध्ये चांगला प्रतिसाद पहावयास मिळाला. पेण तालुक्यातील हजारो कर्मचाऱ्यांना या आंदोलन सहभाग घेतला होता. त्यामुळे शहरातील सर्वच प्रशासकीय कार्यालये ओस पडल्याचे चित्र होते.
‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ अशा घोषणा देत पेण तहसिल कार्यालयासमोर या संपातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी काढण्यात आलेल्या मोर्चात शासकीय, निमशासकीय व इतर स्तरावरील कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. त्यामुळे सर्वच शासकीय कार्यालये ओस पडली होती. विशेष म्हणजे, या आंदोलनामुळे मार्च अखेर होणारे महसुली कामकाज ठप्प झाल्याचे चित्र होते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विविध प्रकारच्या योजना, पुरवठा विभागातील रेशनिंगची कामे, पालिकेतील कर वसुली, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दाखल्यांवर या संपाचा परिणाम पहायला मिळाला. यावेळी संपकऱ्यांना शासनाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कामावर रुजू होणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली होती.
---------------------------------------
परीक्षांवर परिणाम नाही
या संपामध्ये शासकीय, निमशासकीय, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, नगरपालिका, ग्रामपंचायत कंत्राटी कर्मचारी, समन्वयक समिती, आरटीओ कार्यालय आदी शासकीय कर्मचारी संघटना सहभागी झाल्या आहेत. तर दुसरीकडे दहावी-बारावीच्या सुरू असणाऱ्या परीक्षांकरीता शिक्षक उपस्थित आहेत. तसेच पेपर तपासणी देखील संप काळात सुरू राहणार असल्याचे शिक्षकांनी सांगितले.