
पंचायत समिती सदस्या स्मिता पवार यांचे निधन
मनोर, ता. १४ (बातमीदार) : ठाकरे गटाच्या नेत्या आणि तारापूर गणाच्या विद्यमान पंचायत समिती सदस्या स्मिता पवार (वय ४५) यांचे रविवारी (ता. १२) हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती व दोन मुली असा परिवार आहे. २०१२ च्या दरम्यान स्मिता पवार तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदेच्या सदस्यपदी निवडून आल्या होत्या. त्यानंतरच्या काळात दोनवेळा पालघर पंचायत समितीच्या सदस्यपदी निवडून आल्या होत्या. अलीकडेच त्यांची शिवसेना ठाकरे गटाच्या महिला विभाग अध्यक्षपदी निवड झाली झाली होती. शांत व मनमिळावू स्वभावाच्या स्मिता पवार मतदार संघात लोकप्रिय होत्या. त्यांच्या अंत्ययात्रेला पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढाण, ठाकरे गटाचे पालघर जिल्हा प्रमुख विकास मोरे, राजन पाटील, माजी जिल्हा प्रमुख उत्तम पिंपळे, माजी जिल्हा परिषद सदस्या शुभांगी कुटे, ज्योती मेहेर, माजी उपसभापती मनोज संखे, सुधीर तमोरे, कल्पेश पिंपळे, ज्येष्ठ शिवसैनिक आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.