
दापचरीत घरफोडी करून ऐवज लंपास
कासा, (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील दापचरी येथील कृषी क्षेत्र क्रमांक २२ मधील घरात दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री घरफोडीची घटना घडली. अज्ञात चोरट्याने जवळपास दीड लाख रुपयांची रोख रक्कम व दागिने असा एकूण एक लाख पंचावन्न हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. दापचरी येथील कृषी क्षेत्र क्रमांक २२ मधील अंजुम शेख यांच्या घरी शुक्रवारी रात्री घरात कोणीच नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी चोरी केली. रात्रीच्या वेळी चोरटे घराच्या मुख्य दरवाजाचे कडी-कोयंडा तोडत मुद्देमाल घेऊन पसार झाले. ही चोरी करीत असताना आजूबाजूस सामसूम असल्याने चोरट्याने डाव साधला. घरात कपाटातील कपडेलत्ते अस्ताव्यस्त करून ठेवले. या चोरीबाबत तलासरी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल होऊन पोलिस तपास करीत आहेत.
-------------------------------------------
उपजिल्हा निबंधकपदी शिरीष कुलकर्णी
विरार, (बातमीदार) : पालघर सहकारी उपजिल्हा निबंधक पद मागील चार महिन्यांपासून रिक्त होते. रिक्त पदामुळे जिल्ह्यातील सहकारी सोसायट्यांची अनेक कामे रखडली होती. यामध्ये महत्त्वाचे काम म्हणजे डिम कन्वेअन्सचे काम होते. याबाबत सातत्याने सरकारकडे जिल्हा उपनिबंधकाची मागणी नागरिक करत होते. त्यांच्या मागणीला यश आले असून, जिल्हा उपनिबंधकपदी शिरीष कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहकारी उपजिल्हा निबंधक (डीडीआर) हे पद व या कार्यालयातील आवश्यक कर्मचाऱ्यांची पदे तात्काळ भरण्यात यावीत, अशी आग्रही मागणी वसईतील विधिज्ञ निमेश वसा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन तात्काळ ही नियुक्ती करण्यात आलेली आहे.