
डोंबिवलीत मध्यरात्री उदय सामंत यांची धाड...
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १४ : कल्याण-डोंबिवली परिसरात पाण्याच्या पाईपलाईनला टॅप मारून पाणी चोरणाऱ्या टॅंकर माफियांवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी मध्यरात्री डोंबिवलीत धाड टाकत बेकायदा मिनरल वॉटर कंपनीदेखील सील करण्याचे आदेश दिले. कल्याण-डोंबिवलीतील २७ गावांत पाण्याचा प्रश्न बिकट असून पाणी माफियांचे प्रस्थ या ठिकाणी जास्त आहे. या गावांना येत्या सात दिवसांत मुबलक पाणीपुरवठा व्हावा व पाणी चोरणाऱ्या टॅंकर लॉबीवर कठोर कारवाई व्हावी, असे आदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एका बैठकीत दिले होते. आदेश देऊन २४ तास उलटत नाहीत तोच उदय सामंत यांनी ही पाहणी करत कारवाई केली.
कल्याण लोकसभा मतदार संघातील पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली होती. सोमवारी पार पडलेल्या बैठकीत सामंत यांनी एका आठवड्याच्या कालावधीत २७ गावांतील नागरिकांना मुबलक पाणी देण्यात यावे, असे न झाल्यास सर्व विभागांच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी सूचना सामंत यांनी प्रशासनास दिल्या होत्या. तसेच एमआयडीसी व पालिकेच्या पाईपलाईनमधून पाणी चोरणाऱ्या टॅंकर लॉबीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. दरम्यान, पालिकेकडून मोफत दिल्या जाणाऱ्या टॅंकरची संख्या ही कमी असून सर्वच भागांत हे टॅंकर मोफत दिले जात नाहीत. त्यामुळे नागरिकांना खासगी टॅंकरचा आधार घ्यावा लागतो. यामुळे टॅंकर माफियादेखील सक्रिय झाले आहेत. काही टॅंकरचालक सोसायटी, चाळ यांना पाणी विकत देताना ४५० रुपयांची पावती फाडतात आणि प्रत्यक्षात रहिवाशांकडून दोन ते तीन हजार रुपये उकळले जातात. यामध्ये पालिका अधिकारी, टॅंकर चालकांचे साटेलोटे असून अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने ही टॅंकर लॉबी सक्रिय असल्याचा आरोप यापूर्वी अनेकदा स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
-------
मिनरल वॅाटरचा कारखाना सील
या धाडीनंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सदर कंपनी सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी, प्रांत अभिजित भांडे पाटील यांना दिले आहेत. त्यानुसार कंपनी सील करण्यात आली आहे. टॅंकर चालकांचे परवाने जागच्या जागी रद्द करण्यात आले आहेत. तसेच टॅंकर लॉबीचे ऑडिट करण्याचे निर्देश सामंत यांनी या वेळी दिले. २७ गावांमधील नागरिकांना पाणीटंचाईमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी यापुढे पाणीचोरांवर वर्षभर नियमित कारवाई केली जाईल, असे उदय सामंत यांनी या वेळी सांगितले.
----
त्या ठिकाणी पाणी चोरी नाही पालिकेचा खुलासा
मंत्र्यांच्या दौऱ्यानंतर पालिका प्रशासनाने मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत याची चौकशी सुरू केली. पालिका प्रशासनाने संदप रोड परिसरातील तिन्ही ठिकाणची पाहणी मंगळवारी केली. या ठिकाणी पाईपलाईनवरून पाणी चोरी होत नसून बोअरवेलमधील पाणी वापरले जात असल्याचा खुलासा पालिका अधिकाऱ्यांनी केला आहे. पालिकेच्या या खुलाशामुळे आश्चर्य व्यक्त होत असून या सर्व प्रकारावरच प्रश्न उपस्थित केला जात आहे.
---
तक्रारीनुसार संदप रोड परिसरातील तिन्ही ठिकाणची पाहणी करण्यात आली आहे. तिन्ही ठिकाणी पाणी चोरी होत असल्याची कोणतीही बाब निदर्शनास आलेली नाही. याचा अधिक तपास सुरू आहे.
- किरण वाघमारे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग.