
डोंबिवली स्टेशन परिसर फेरिवाला मुक्त करा
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १४ : कल्याण-डोंबिवली स्टेशन परिसराला फेरीवाल्यांचा विळखा पडला असून यामुळे प्रवाशांना मार्ग काढणे कठीण जाते. सोबतच रिक्षांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून योग्य नियोजनाअभावी वाहतूक कोंडीचा सामना दररोज प्रवाशांना करावा लागत आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसांत स्टेशन परिसर फेरीवालामुक्त करा, रिक्षा थांब्यांचे योग्य नियोजन करून वाहतूक कोंडी सोडवा; अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी प्रशासनास दिला आहे.
कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सोमवारी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेतली. या वेळी स्टेशन परिसरात फेरीवाले, रिक्षाचालक यांची गर्दी होत असल्याने प्रवाशांना चालणे मुश्किल झाले आहे. प्रवाशांना रोजच वाहन कोंडीचा सामना करावा लागत आहे. याविषयी आमदार पाटील म्हणाले की, पूर्व स्टेशन परिसरातील रस्ते फेरीवालामुक्त करण्यात यावा, तसेच स्टेशन परिसरातील रिक्षा स्टॅण्डमुळे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे रिक्षा स्टँडचे नियोजन करत हा परिसर फेरीवाला आणि वाहतूक कोंडीमुक्त करावा; अन्यथा आंदोलनाचा करू, असे सांगताच आयुक्तांनी यावर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले. यामुळे १५ दिवसांसाठी आंदोलन स्थगित केले आहे; मात्र पंधरा दिवसांत कारवाई झाली नाही, तर मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
-------
जप्तीची नोटीस त्वरित रद्द करा
केडीएमसीने पलावा येथील कासा रिओ आणि कासा बेला या परिसरातील २५ हजार फ्लॅटधारकांना मालमत्ता कर न भरल्याने जप्तीची नोटीस पाठविली आहे. या नोटिसा त्वरित रद्द करून आयटीपी योजनेअंतर्गत मालमत्ता करात ६६ टक्के सूट देत नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी मनसे आमदार पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे या वेळी केली. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी आम्ही करत असून पालिकेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळी पाटील यांनी सांगितले.