
तळोजा औद्योगिक क्षेत्रातील वायू प्रदूषण जैसे थे
खारघर, ता. १४ (बातमीदार) : तळोजा औद्योगिक क्षेत्रात प्रदूषणाचे मोजमाप करणारे स्वयंचलित यंत्र उभे केल्यानंतर पाच दिवस परिसरात प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले होते; मात्र हे यंत्र हटवल्यावर सहाव्या दिवसांपासून पूर्वीप्रमाणे उग्र वास येत असून औद्योगिक क्षेत्रातील वायुप्रदूषण जैसे थे असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, प्रदूषणाविषयी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीच्या अहवालात असे काय होते, की प्रदूषणाचे मोजमाप करणारे स्वयंचलित यंत्र हटवण्यात आले, असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत.
तळोजा एमआयडीसीमधील उग्र वास आणि दुर्गंधीमुळे रहिवाशांना त्रास होत असल्याची तक्रार आदर्श सामाजिक संस्थेने लोक आयुक्तांकडे केल्यानंतर लोक आयुक्तांनी नवी मुंबई प्रदूषण महामंडळाने प्रदूषण मोजमाप करणारे यंत्र बसवावे, तसेच प्रदूषणाची पाहणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी पथकाने तीन आठवड्यांत अहवाल सादर करावा, असे आदेश राज्याच्या पर्यावरण विभागाने दिले होते. दरम्यान, राज्य प्रदूषण महामंडळाने तळोजा वसाहत, सिद्धी करवले, घोट परिसर, तळोजा, नावडे, कळंबोली, खारघर अशा जवळपास अकरा ठिकाणी वायुप्रदूषण मोजमाप करण्यासाठी स्वयंचलित यंत्र असलेले वाहन कार्यान्वित केले होते. दरम्यान, या वेळी परिसरात प्रदूषण मोजमाप करणारे यंत्र कार्यान्वित केल्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले होते; मात्र सहाव्या दिवशी प्रदूषण मोजमाप करणारे यंत्र हटवल्यावर रात्री पुन्हा पूर्वीप्रमाणेच उग्र वास येत आहे. याविषयी प्रदूषण महामंडळाचे तळोजा विभागीय अधिकारी सचिन आडकर यांच्याशी संपर्क केला असता, प्रदूषण मोजमाप झाल्यामुळे यंत्र हटवण्यात आले असल्याचे सांगितले.
---
लोक आयुक्तांच्या आदेशानंतर तळोजा वसाहत, औद्योगिक आणि परिसरातील काही गावांत प्रदूषण मोजमाप करण्यासाठी यंत्र कार्यान्वित करण्यात आले होते. या पाच दिवसांत एकही अधिकारी प्रदूषण मोजमाप करणाऱ्या यंत्राकडे फिरकले नाही. रात्रीच्या वेळी कोणत्या कंपनीतून प्रदूषण येते हे पाहणे आवश्यक होते; मात्र प्रदूषण महामंडळाकडून काहीही झाले नाही. ११ मार्चला प्रदूषण मोजमाप करणारे यंत्र हटवल्यावर दुसऱ्या दिवसापासून पुन्हा नेहमीप्रमाणे उग्र वास येत आहे.
- राजीव सिन्हा, पदाधिकारी, आदर्श सामाजिक संस्था.