कोरोनाने बळावतोय! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाने बळावतोय!
कोरोनाने बळावतोय!

कोरोनाने बळावतोय!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता.१४ : देशात ‘एच ३ एन २’ विषाणूचा शिरकाव झाला असतानाच गेल्या वर्षभरापासून हद्दपार असलेल्‍या कोरोनाने पुन्हा डोकेवर काढायला सुरुवात केली आहे. गेल्या आठवडाभरात ठाणे जिल्ह्यात तब्बल ६७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, सक्रीय रुग्णसंख्या ७९ वर पोहोचली असल्याची धक्कादायक आकडेवारी हाती आली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण ठाणे महापालिका क्षेत्रातील असून, दुसरा क्रमांक नवी मुंबईचा लागला आहे. त्यामुळे ठाणेकरांनो सावधान, सार्वजनिक ठिकाणी पुन्हा मास्क घाला, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.
मार्च २०२० मध्ये ठाण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. या फेऱ्याला आता तीन वर्षे पूर्ण होत आहे. या तीन वर्षांमध्ये सुमारे ७ लाख ४७ हजार ५८७ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी ७ लाख ३६ हजार ३०७ रुग्णांनी कोरोनावर मात केली असली तरी कोरोनाने ११ हजार ९६९ रुग्णांना जीव गमवावा लागला. या दरम्‍यानच्‍या काळात लसीकरणावर जोर दिला गेला असल्याने, गेल्या दहा महिन्यांपासून कोरोनाला हद्दपार करण्यात संपूर्ण आरोग्य यंत्रणेला यश आले. पण आता पुन्हा मार्च महिना उजाडताच कोरोनाने एण्ट्री घेतल्यामुळे आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण हळूहळू वाढताना दिसू लागले आहे.
-------------------------------
शहर परिसरात शिरकाव
गेल्या आठवडाभराचा आढावा घेतला असता ७ मार्चला जिल्ह्यात दोन रुग्ण आढळले होते. मात्र आठवडाभरातही दैनंदिन नवीन रुग्णसंख्या आता १९ वर पोहचली आहे. दैनंदिन रुग्णसंख्येमध्ये ठाणे महापालिका पुन्हा हिटलिस्टवर आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये येथे ३९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. नवी मुंबईत १२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या तीन लाटांमध्येही ही दोन्ही महानगरांमध्ये कोरोनाने हाहाकार केला होता. जिल्ह्यातील बहुतेक सर्वच महापालिकेला, नगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोनाने शिरकाव केला असून, ग्रामीण भागही त्याला अपवाद राहिला नाही.
--------------------------------------------
मार्च महिना ‘डेंजर’
पहिली आणि दुसरी लाटही मार्च आणि एप्रिल महिन्‍यामध्येच आली होती. त्याचदरम्यान कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली होती. त्यातच बूस्टर डोस घेण्याकडे नागरिकांनी आता पाठ फिरवली आहे. सध्याचे वातावरण रुग्णवाढीस पूरक असल्याचे दिसत आहे. परंतु नेमके कारण अद्यापही समोर आले नाही.
..................................
कोट :-
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून गर्दीच्या ठिकाणी तोंडाला मास्क लावावा. त्याचबरोबर गर्दीत जाणे टाळावे. हात स्वच्छ धुवावे हे त्रिसूत्री धोरण नागरिकांनी अंगीकारावे.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे.
-----------------------
ठाणे हिटलिस्‍टवर...
दैनंदिन नवीन रुग्णसंख्या १९
आठवड्यात नवीन रुग्ण ३९
नवी मुंबईतील रुग्‍णसंख्‍या १२

--