धूळ नियंत्रणासाठी पालिकेचा वॉर्डनिहाय फ्लाईंग स्क्वाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धूळ नियंत्रणासाठी पालिकेचा वॉर्डनिहाय फ्लाईंग स्क्वाड
धूळ नियंत्रणासाठी पालिकेचा वॉर्डनिहाय फ्लाईंग स्क्वाड

धूळ नियंत्रणासाठी पालिकेचा वॉर्डनिहाय फ्लाईंग स्क्वाड

sakal_logo
By

मुंबई, ता. १४ : मुंबई महापालिका धुळीच्या नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी एक स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) अर्थात मार्गदर्शक तत्त्वे तयार करत आहे. त्यांची अंमलबजावणी १ एप्रिलपासून होणार आहे. धुळीच्या नियंत्रणासाठी सातसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. धूळ नियंत्रणाचा भाग म्हणून महापालिका वॉर्डनिहाय फ्लाईंग स्क्वाड नेमणार आहे. स्क्वाडच्या माध्यमातून नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला नोटीसही देण्यात येणार आहे.

पालिकेने १ एप्रिलपासून धूळ नियंत्रण उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यासोबतच नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली सातसदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली आहे. समितीने मुंबईतील धूळ प्रदूषणाबाबत सात दिवसांत अहवाल द्यावा, असे आदेश प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत.

अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती एसओपी तयार करण्यासाठी नेमण्यात आली आहे. समितीमध्ये उपायुक्त (पर्यावरण), उपायुक्त (पायाभूत सुविधा), उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन), प्रमुख अभियंता (विकास नियोजन), महापालिका आयुक्त कार्यालयाचे प्रतिनिधी कार्यकारी अभियंता सतीश गीते, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नामनिर्देशित सदस्य आदींचा सदस्य म्हणून समावेश असणार आहे.

‘फ्लाईंग स्क्वाड’ची जबाबदारी
- प्रत्येक विभागवार नेमण्यात आलेले स्क्वाड धुळीचे प्रदूषण करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारणार आहेत. मोठ्या बांधकामांच्या ठिकाणी फ्लाईंग स्क्वाड भेट देऊन त्या ठिकाणच्या धुळीच्या प्रदूषणाची आकडेवारी घेणार आहेत. त्यासोबतच हवेची गुणवत्ता खराब करणाऱ्या बांधकामाच्या ठिकाणीही संबंधितांना नोटीस देण्यात येणार आहे.
- १ एप्रिलपासून निश्चित करण्यात आलेल्या एसओपीचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पहिल्यांदा सूचना देण्यात येईल. त्यानंतर काम थांबवण्याचे आदेशही देण्यात येणार आहेत.
- वारंवार उल्लंघन होणाऱ्या बांधकामांच्या साईट्‍सवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. धुळीच्या नियंत्रणासाठी कारणीभूत ठरणाऱ्यांना सुरुवातीला सुधारण्याची संधी देण्यात येईल. त्यानंतर पुन्हा धुळीच्या प्रदूषणाचा प्रकार आढळल्यास अशा ठिकाणी कारवाई करण्यात येणार आहे.