
शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १४ : उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली म्हणून हिंदुत्व सोडले, अशी जर देवेंद्र फडणवीस यांची धारणा असेल, तर मग त्याच राष्ट्रवादीसोबत नागालँडमध्ये घरोबा करणारी भाजप ही नकली हिंदुत्ववादी आहे, असाच याचा अर्थ होतो. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांच्या पदाच्या खुर्चीला त्यांनी एका क्षणात लाथ मारली पाहिजे. असे म्हणत ठाकरे गटाच्या शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
शीतल म्हात्रे मॉर्फ व्हिडीओ प्रकरणात अटक करण्यात आलेले कल्याणमधील विनायक डावरे यांच्या कुटुंबियांची भेट ठाकरे गटाच्या उपनेत्या अंधारे यांनी मंगळवारी घेतली. कल्याणमध्ये त्या आल्या असता श्याम देशमुख यांचा भाजप प्रवेश आणि त्यावर फडणवीस यांनी उद्धव यांच्यावर केलेली टीका याला उत्तर देताना अंधारे यांनी वरील वक्तव्य करत फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरदेखील अंधारे यांनी या वेळी निशाणा साधला. उद्धव ठाकरेंच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली. तसेच याचिकाकर्त्या गौरी भिडे यांना २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. ‘गौरी भिडे हा चेहरा आहे, याच्या मागचा मास्टरमाईंड शोधला पाहिजे. हाच मास्टरमाईंड मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही चालवतो,’ असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.
---
गृहमंत्री म्हणून फडणवीस कुचकामी
शीतल म्हात्रे यांचा पाठलाग केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. याविषयी अंधारे म्हणाल्या, की याचा अर्थ गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कुचकामी ठरत आहेत. एखाद्या चर्चेत असलेल्या व्यक्तीचा जर पाठलाग होत असेल, तर गृहमंत्रालय हे अपयशी ठरले आहे. यावर तात्काळ मुख्यमंत्री शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खाते काढून घेतले पाहिजे.
--------
किरीट सोमय्या यांना टोला
चिवल्या बीचवर नारायण राणे यांचा बंगला पाडण्याची कोर्टाने ऑर्डर दिली आहे. यावर कोर्टाने आता एक स्मरणपत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यावर काहीच कारवाई होत नाही. किरीट सोमय्या अतिक्रमण विभाग जर कामात असेल तर किरीट यांनी नेहमीप्रमाणे हातात हातोडा घेऊन जाण्यास काही हरकत नाही. पार्टटाइम पेमेंटही त्यांना मिळेल, असा टोला सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्या यांना लगावला.