पौष्टिक तृणधान्यासाठी पनवेलमध्ये रणनिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पौष्टिक तृणधान्यासाठी पनवेलमध्ये रणनिती
पौष्टिक तृणधान्यासाठी पनवेलमध्ये रणनिती

पौष्टिक तृणधान्यासाठी पनवेलमध्ये रणनिती

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. १५ (वार्ताहर)ः पनवेल महापालिका आणि तालुका कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानातून ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ साजरे करण्यात येत आहे. याच अनुषंगाने महापालिकेकडून देखील नियोजनावर भर दिला जात असून नुकतीच याबाबतची कृती दलाची बैठक (ता.१४) पालिका मुख्यालयात घेण्यात आली होती.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. जागतिक स्तरावर हा उपक्रम साजरा केले जाणार आहे. त्यादृष्टीने राज्यात देखील हे अभियान राबवले जाणार आहे. याच अनुषंगाने पनवेल महापालिका आणि कृषी विभाग यांच्या संलग्न विभागाच्या समन्वयाने नियोजन केले जात असून आराखडा निश्चित करण्यासाठी एक बैठक घेण्यात आली होती. तृणधान्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असून यामध्ये तंतूमय पदार्थ, खनिजे, जीवनसत्वे भरपूर असतात. रोगप्रतिबंधक शक्ती वाढविणारी ही तृणधान्ये असतात. तसेच कमी पाण्यावर येणारी ही तृणधान्ये असतात. हवामान बदलास अनुकूल अशी ही पिके असतात, अशी माहिती यावेळी मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी दिली.
------------------------------------
विविध उपक्रमांवर भर
पनवेल महापालिकेच्यावतीने सुरू असलेल्या बचत गटांच्या महिला या उपक्रमामध्ये सामील करून तृणधान्यापासून विविध पदार्थांचे प्रशिक्षण देणे, जाहिरातींसह विविध उपक्रम राबवणे, पालिकेच्या विविध विभागाचा सक्रिय सहभाग या उपक्रमामध्ये असणार आहे.
------------------------------------
आपल्या शरीराला संतुलित आहाराची गरज असते. बदलत्या काळामध्ये संतुलित आहारासाठी तृणधान्याचे आहारातील महत्त्व आणि फायदे मोठे आहेत. सर्वसामान्यांना तृणधान्याचे महत्त्व पटवून देण्याकरिता लोकचळवळ उभी राहिली पाहिजे.
-गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महापालिका