अंबरनाथला ‘शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबरनाथला ‘शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल’
अंबरनाथला ‘शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल’

अंबरनाथला ‘शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल’

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. १५ (बातमीदार) : जगविख्यात कलाकारांचे मंत्रमुग्ध करणारे संगीत सादरीकरण, विविध प्रांतातील खाद्य संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या पदार्थांचे स्टॉल्स, नामवंत कलावंतांच्या कलाकृतींचे प्रदर्शन, छायाचित्र प्रदर्शन, लाईव्ह पेंटिंग, पोट्रेट पेंटिंग, शिल्पकला अशा विविध गोष्टींचा समावेश असलेल्या ‘शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल’मध्ये अभिजात कलांचे दर्शन नागरिकांना घडणार आहे.

१६ ते १९ मार्च या कालावधीत अंबरनाथमधील शिवमंदिराच्या प्रांगणात ‘आर्ट फेस्टिव्हल’चे आयोजन करण्‍यात आले आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या फेस्टिव्हलचे उद्‌घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १६ मार्चला होणार आहे. त्‍यांच्याच हस्ते मंदिरात महाआरती केली जाणार आहे.

फेस्टिव्हलमध्ये एकाहून एक सरस अशा कार्यक्रमांची पर्वणी अनुभवयाला मिळणार आहे. दर वर्षीप्रमाणे यंदाही महोत्सवातील कलादालनांमध्ये तब्बल ६० हून अधिक नामवंत चित्रकार, शिल्पकारांच्या उत्कृष्ट कलाकृती विशेष आकर्षण ठरणार आहेत.
अंबरनाथ शहरात ९६३ वर्ष प्राचीन शिलाहारकालीन शिवमंदिराच्या परिसरात गेल्या पाच वर्षांपासून दर वर्षी ‘शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात येते. फेस्टिव्हलमध्ये काही कलाकारांनी तयार केलेल्या कलाकृती कलादालनात प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. हे कला प्रदर्शन महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका विनामूल्य असून विविध केंद्रांवर त्या उपलब्ध आहे.
-----------------------------
आंतराष्ट्रीय कीर्तीच्या गायकांची उपस्थिती
कला महोत्सवात राकेश चौरसिया, पंकज उदास, अमित त्रिवेदी, अनुराधा पौडवाल, मोहीम चौहान, मैथली ठाकूर आणि शंकर महादेवन हे सात लोकप्रिय कलावंत त्यांच्या लोकप्रिय रचना सादर करणार आहेत.
--------------------
चारदिवसीय महोत्‍सव
गुरुवार, १६ मार्च : संध्याकाळी ६ वाजता मुख्य रंगमंचावर पहिल्या सत्रात प्रख्यात बासरीवादक राकेश चौरसिया आणि सहकाऱ्यांचे फ्युझन, दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ गायक पंकज उदास त्यांच्या सदाबहार गझल सादर करणार आहेत.

शुक्रवार, १७ मार्च : संध्याकाळी ६ वाजता मुख्य रंगमंचावर नव्या पिढीचा लोकप्रिय गायक अमित त्रिवेदी आणि सहकाऱ्यांचे सादरीकरण होईल.

शनिवार, १८ मार्च : सकाळी ७ वाजता शिवमंदिराच्या प्रांगणातील दुसऱ्या रंगमंचावर लोकप्रिय गायिका अनुराधा पौडवाल यांच्या समधुर गीतांची पर्वणी अनुभवायला मिळणार आहे. संध्याकाळी ६ वाजता मुख्य रंगमंचावर गायक मोहित चौहान आणि सहकाऱ्यांचे सादरीकरण होईल.

रविवार १९ मार्च : सकाळी सात वाजता शिवमंदिराच्या प्रांगणातील दुसऱ्या रंगमंचावर अल्पावधीतच सुरेल गायनाने गायिका मैथली ठाकूर रसिकांपुढे तिची गाणी सादर करणार आहे. संध्याकाळी मुख्य रंगमंचावर गायक शंकर महादेवन यांच्या सादरीकरणाने महोत्सवाची सांगता होईल.