
पालिका मुख्यालयावर रविवारी टाळेठोक आंदोलन
विरार, ता. १५ (बातमीदार) : वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने रविवारी (ता. १९) विरार येथील महानगरपालिकेच्या मुख्यालयावर टाळेठोक आंदोलन करण्यात येणार आहे. पालघर जिल्हा अध्यक्ष तथा ठाणे संपर्कप्रमुख हितेश जाधव यांनी ही माहिती दिली. वसई-विरार शहरातील सर्वसामान्य जनतेचे वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न, मूलभूत सोयीसुविधा, अपुरे आणि अनियमित पिण्याचे पाणी, खड्डेमय रस्ते, शहरात ठिकठिकाणी पसरत असलेले कचऱ्याचे साम्राज्य, दिव्यांगांसाठीच्या अपुऱ्या सोयी-सुविधा, स्वच्छतागृह/शौचालयाची कमतरता, निकृष्ट दर्जाची परिवहन सेवा, भटक्या श्वानांच्या निर्बीजीकरणाबाबत उदासीनता, सलाईनवर असलेली आरोग्यव्यवस्था आदी समस्यांवर पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने हे आंदोलन पुकारले आहे.