
क्षयरोग पीडित मुलींना उपयोगी वस्तुंचे वाटप
भिवंडी, ता. १५ (बातमीदार) : जागतिक महिला दिनानिमित्ताने ‘मेक अ विश इंडिया’ या संस्थेतर्फे क्षयरोगबाधित मुलींकरिता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाच्या अंतर्गत भिवंडी महापालिकेच्या माध्यमातून अवचितपाडा नागरी आरोग्य केंद्र येथे हा कार्यक्रम पार पडला. ११ ते १७ वयोगटातील मुली यात सहभागी झाल्या.
सदर कार्यक्रमामध्ये क्षयरोगबाधित मुलींच्या मनातील इच्छा जाणून घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी या संस्थेमार्फत मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यानुसार त्यांच्या गरजेनुसार २७ मुलींना पालिकेमार्फत त्यांना सायकल, मोबाईल, लॅपटोप, टब, टी.व्ही., खेळणी आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात मुलींना क्षय आजाराबाबत जागृत करण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व घनश्याम शर्मा (एसटीएसयू पुणे) यांनी समजून सांगितले. डॉ. बुशरा सय्यद (वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा शहर क्षयरोग अधिकारी) यांनी आरोग्य विषयी माहिती दिली. तथा मोबाईल आणी लॅपटॉपचा वापर आपल्याला जीवनात शिक्षण व अभ्यासाकरिता सदुपयोग करून घेण्यासाठी प्रोत्साहित केले.
या कार्यक्रमास डॉ. बुशरा सय्यद, घनश्याम वर्मा, स्मिता पाटील (मेक अ विश इंडिया स्वयंसेवक), मोबीन शेख (वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक), अशोक साबळे (वरिष्ठ औषध उपचार पर्यवेक्षक), अनिल गुप्ता (जिल्हा समन्वयक), विवेक गायकवाड (वरिष्ठ डॉट प्लस पर्यवेक्षक) व सुभाष माने (टीस समुपदेशक) उपस्थित होते.