
नैसर्गिक तलावांचे पुनरुज्जीवन होणार
भाईंदर, ता. १५ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहरातील नैसर्गिक स्थितीत असलेल्या तलावांचे पुनरुज्जीवन करून त्यात अन्नसाखळी निर्माण केली जाणार आहे. यासाठी पर्यावरणतज्ज्ञांची महापालिकेने नेमणूक केली आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून तो सरकारला पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर केंद्र सरकारकडून या कामासाठी निधी मिळणार आहे. या माध्यमातून शहरातील तलावांना नवा साज मिळणार आहे.
मिरा-भाईंदर शहरात १८ तलाव आहेत. यापैकी काही तलावांना महापालिकेने संरक्षक भिंत घालून त्याचे सुशोभीकरण केले आहे. मात्र, आजही काही तलाव नैसर्गिक स्थितीत आहेत. त्यातील पाण्याचा फारसा वापर होत नसल्याने ते पडून आहेत. त्यांच्या अवतीभवती कोणतेही पक्के बांधकाम झालेले नाही अथवा त्यांचे सुशोभीकरणही झालेले नाही. अशा तलावांचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. या तलावांभोवती कोणतेही पक्के बांधकाम केले जाणार नाही; परंतु तलावातून गाळ काढणे, त्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करून त्यात ऑक्सिजन खेळवणे तसेच त्यात नैसर्गिक अन्नसाखळी तयार करून त्यात जीवसृष्टी निर्माण होईल, अशी व्यवस्था करणे आदी कामे केली जाणार आहेत. या तलावांचेदेखील सुशोभीकरण करून त्यात कारंजे बसवले जाणार आहे. उत्तनमधील दोन तलावांचाही त्यात समावेश आहे.
-------------------------------
प्रस्ताव सरकारकडे पाठवणार
तलाव सुशोभीकरणाच्या कामासाठी केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महापालिकेने नैसर्गिक तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ‘जेएमएस बायोटेक’ या पर्यावरणतज्ज्ञ सल्लागाराची नेमणूक केली आहे. सल्लागार या तलावांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणार आहे. या अहवालाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची तांत्रिक मान्यता घेतली जाणार आहे व नंतर तो सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे.
------------------------------
कोट
ज्या तलावांभोवती पक्क्या संरक्षक भिंतींचे काम झाले आहे. अशा तलावांचेदेखील मजबुतीकरण करून त्याचे सुशोभीकरण केले जाणार आहे. या तलावांच्या पाण्याचेही शुद्धीकरण करण्यात येणार आहे. असे एकंदर आठ तलाव असून त्यापैकी दोन तलावांच्या कामांची निविदादेखील काढण्यात आली आहे.
- संजय शिंदे, उपायुक्त, महापालिका