
बँकेतील सफाई कर्मचाऱ्याचा मृतदेह सापडला
अलिबाग, ता. १५ (बातमीदार) : अलिबागमधील युनियन बँकेतील बेपत्ता असलेल्या सफाई कर्मचाऱ्याचा मृतदेह मंगळवारी (ता. १४) सायंकाळी अलिबाग-रेवदंडा मार्गावरील पालव स्मशानभूमीजवळ सापडला. नथुराम पवार (४०) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिबागमधील शास्त्रीनगर परिसरात राहणारे नथुराम पवार हे सोमवारपासून (ता. १३) बेपत्ता होते. या प्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यांचा शोध सुरू असतानाच मंगळवारी सायंकाळी पालव येथील एका स्मशानभूमीजवळ त्यांचा मृतदेह सापडला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, नथुराम पवार यांचा मृतदेह असल्याची ओळख पटली. या प्रकरणात हत्येचा संशय व्यक्त करण्यात येत असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय जाधव यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.