उल्हासनगरात धावणार इकाच्या ३० इलेक्‍ट्रिक बस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हासनगरात धावणार इकाच्या ३० इलेक्‍ट्रिक बस
उल्हासनगरात धावणार इकाच्या ३० इलेक्‍ट्रिक बस

उल्हासनगरात धावणार इकाच्या ३० इलेक्‍ट्रिक बस

sakal_logo
By

दिनेश गोगी : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. १५ : आयुक्त अजीज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल नऊ वर्षांपासून बंद पडलेल्या उल्हासनगर महापालिकेची परिवहन सेवा सुरू होण्याचा मुहूर्त जूनमध्ये निश्चित झाला आहे. त्यामुळे अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली असून, लक्ष वेधणाऱ्या इका कंपनीच्या ३० बस शहरात आणि शहराच्या बाहेर धावताना दिसणार आहेत. या बसमध्‍ये दिव्यांगांसाठी विशेष खुर्चीची व्यवस्था करण्यात आली असल्‍याचे मुख्यालय उपआयुक्त अशोक नाईकवाडे यांनी सांगितले.
२००९ मध्ये परिवहन सेवेचे कंत्राट केस्ट्रल कंपनीचे राजा गेमनानी यांना देण्यात आले होते; मात्र सातत्याने होणारी डिझेल दरवाढ, खड्ड्यांमुळे बसमध्ये होणारा बिघाड पाहता राजा गेमनानी यांनी २०१३ पासून प्रवासी भाडेवाढ करून देण्याची मागणी केली होती. या मागणीला पालिकेने प्रतिसाद दिला नसल्याने शेवटी गेमनानी यांनी २०१४ मध्ये परिवहन सेवेचा गाशा गुंडाळला होता.
त्यानंतर पालिकेने परिवहन सेवा सुरू करण्यासाठी अनेकदा निविदा प्रक्रिया हाताळल्या होत्या, पण त्या भरण्यास कोणतीही कंपनी पुढे येत नसल्याने नऊ वर्षांपासून परिवहन सेवा ठप्प पडली. त्यामुळे विशेषतः गोरगरीब नागरिक आणि विद्यार्थी यांच्यावर रिक्षाने प्रवास करण्याची वेळ आली.
---------------------------------------
हैद्राबादमधील कंपनीची निविदा
आयुक्त अजीज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यालय उपआयुक्त अशोक नाईकवाडे यांनी परिवहन सेवेचा अभ्यास करून बस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांशी बोलणी केली. ४५ कोटी रुपयांतून ३० बस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी निविदा प्रक्रिया हाताळल्यावर हैद्राबादमधील पिनॅकल कंपनीने निविदा भरली असून, त्यास पालिकेने मंजुरी दिली आहे. ही कंपनी १२ वर्षांच्या करारावर परिवहन सेवा हाताळणार आहे. पुढच्या आठवड्यात या कंपनीला वर्क ऑर्डर देण्यात येणार असून, जूनच्या शेवटच्या आठवड्यात परिवहन सेवेच्या बस धावताना दिसणार आहेत.
-----------------------------------
टिटवाळा, भिवंडीपर्यंत धावणार
३० सीटरच्या १५ आणि ५४ सीटरच्या १५ अशा ३० बस धावणार आहेत. त्यात १५ सीटरच्या बस या उल्हासनगर ते कल्याण, बदलापूरपर्यंत; तर ३० सीटरच्या बस या टिटवाळा, भिवंडी, नवी मुंबई अशा लांब अंतरावर धावणार असल्याची माहिती अशोक नाईकवाडे यांनी दिली.