
कामे पूर्ण करण्यापूर्वीच कंत्राटदाराला देयके
मुंबई, ता. १४ : बोरिवली येथील प्रभाग क्रमांक नऊ येथे महापालिकेकडून विविध विकासकामे सुरू आहेत; मात्र ही कामे पूर्ण करण्यापूर्वीच कंत्राटदाराला तब्बल एक कोटी ११ लाख रुपयांची देयके अदा करण्यात आल्याची तक्रार काँग्रेसने पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्याकडे केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही करण्यात काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक नऊमध्ये महापालिकेने लादीकरण, मलनिःसारण वाहिन्यांच्या चेंबरचे नूतनीकरण, व्हीआयपी बाकडे, पदपथ दुरुस्तीसह विविध विकासकामांचे कंत्राट संबंधित कंत्राटदाराला दिले आहे. ही कामे ३१ मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करून त्यानंतर देयके अदा करणे अपेक्षित होते; मात्र तत्पूर्वीच महापालिकेने कंत्राटदाराला एक कोटींहून अधिक रकमेची बिले अदा केल्याचा आरोप येथील काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्वेता कोरगांवकर यांनी केली आहे. या प्रकरणी काँग्रेसचे पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांना पत्र पाठवून चौकशी करण्याची मागणी केली आहे.