
टँकरची धडक लागून व्यक्तीचा मृत्यू
अंधेरी, ता. १५ (बातमीदार) ः रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एका ४० वर्षांच्या व्यक्तीचा टँकरखाली चिरडून मृत्यू झाला. राजेश फुलसिंग मिना असे या मृत व्यक्तीचे नाव असून त्याच्या मृत्यूप्रकरणी हरीशंकर कालिकाप्रसाद यादव या टँकरचालकास बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने जामिनावर सोडून दिले. हा अपघात मंगळवारी (ता. १४) दुपारी बोरिवलीतील न्यू लिंक रोड, डॉन बॉस्को सिग्नजवळील वझीरा पार्किंगमध्ये झाला. सुरेश रामदुलार गुप्ता हे बेस्टमध्ये चालक म्हणून कामाला असून तो सध्या गोरेगाव येथील गोकुळधाम परिसरात राहतो. सप्टेंबर महिन्यांपासून ते वझीरा नाका येथे सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. त्यांच्यावर बेस्टच्या जागेवर पार्किंग होणाऱ्या वाहनांची देखरेख करण्याची जबाबदारी होती. या ठिकाणी ग्राऊंडमध्ये एक पाण्याची टाकी असून त्यातील पाणी बस धुण्यासाठी वापरले जाते. पाणी भरण्यासाठी तिथे नेहमी पाण्याचा टँकर येतो. मंगळवारी दुपारी पावणेदोन वाजता तिथे नेहमीप्रमाणे एक पाण्याचा टँकर आला होता. पाणी भरल्यानंतर चालकाने टँकर मागे घेतला. या वेळी अचानक आवाज आल्याने चालकाने टँकर थांबविला आणि मागे वळून पाहिले असता टँकरच्या चाकाखाली रस्त्यावर झोपलेले राजेश मिना हे गंभीररीत्या जखमी झाल्याचे दिसून आले. अपघाताची माहिती मिळताच बोरिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या राजेशला पोलिसांनी तातडीने कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. तिथे राजेशला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी सुरेश गुप्ता यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीनंतर हरिशंकर यादव याच्याविरुद्ध पोलिसांनी हलगर्जीपणाने टँकर चालवून झोपेत असलेल्या एका व्यक्तीला चिरडून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच हरिशंकर यादवला पोलिसांनी अटक केली. मात्र हा गुन्हा जामिनपात्र असल्याने नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.