
आरपीएफ जवानांच्या गणवेशात कॅमेरे
मुंबई, ता. १५ : रेल्वे परिसरातील गुन्हेगारी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांच्या गणेशवावर आता बॉडी कॅमेरा लावण्याचा निर्णय आरपीएफ पोलिसांनी घेतला आहे. येत्या महिनाभरात हे ४० कॅमेरे मुंबई विभागात दाखल होणार आहेत. त्यामुळे रेल्वे मार्गावरील गुन्ह्यांचा तपास करण्यास आरपीएफला मदत मिळणार आहे.
रेल्वे पोलिसांच्या गणवेशावर एका बाजूला हे कॅमेरे बसवण्यात येणार आहे. सुरुवातीला अशा प्रकारे ४० कॅमेरे मध्य रेल्वेस उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने या कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्यात येणार आहेत. या बॉडी कॅमेऱ्यांमुळे आरपीएफ जवान, अधिकाऱ्यांना गाडीमध्ये गस्त घालताना साह्य होणार आहे. गाड्यांमधील चोऱ्यांसह गाड्यांमध्ये शिरणाऱ्या अनोळखी व्यक्तींवरही लक्ष ठेवण्यास मदत मिळणार आहे. तिकीट तपासनिसांबरोबरही अनेकदा गैरवर्तन होण्याच्या तक्रारी होतात. त्यालाही आळा घालण्यास मदत मिळणार आहे. याकरिता अंदाजे २४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. येत्या एका महिन्यात ४० बॉडी कॅमेरे आरपीएफकडे येतील, अशी माहिती मध्य रेल्वे आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ऋषी शुक्ला यांनी ‘सकाळ’ला दिली.