
दिव्यांगांची पालिकेकडून उपेक्षा
घणसोली, ता. १६ (बातमीदार)ः नवी मुंबईतील दिव्यांगांना सिडकोच्या वतीने स्टॉलसाठी जागा देण्यात आली आहे. मात्र, दोन महिने उलटून गेले, तरी स्टॉलचे वाटप झालेले नाही. त्यामुळे घणसोली सेक्टर ४ येथील राजेंद्र आश्रमजवळच्या पदथांवर धूळखात पडलेल्या स्टॉलमुळे दिव्यांग संघटनांमधून पालिकेविरोधात नाराजीचा सूर उमटत आहे.
दिव्यांगांसाठी कल्याणकारी योजना करणारी महापालिका ही नवी मुंबईची ओळख आहे. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी त्यांना स्वयंरोजगाराद्वारे आर्थिक बळ देण्यासाठी इतरांप्रमाणेच दिव्यांगांनी मुख्य प्रवाहात येऊन काम करावे, यासाठी नवी मुंबई महापालिका नेहमी प्रयत्नशील राहते. यामध्ये नवी मुंबईतील दिव्यांग नागरिकांना सन्मान स्टॉल्स महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. त्यासाठी सिडकोने नवी मुंबईत भूखंडदेखील उपलब्ध करून दिले आहे. मात्र, गेले २-३ महिने उलटूनही हे स्टॅाल अद्याप दिव्यांगांना मिळाले नसस्याने दिव्यांग संघटनांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
-------------------------------
दोन महिन्यांपासून पदपथावरच
महापालिकेला ७४१ दिव्यांगांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी पहिल्या टप्य्यात ३३० स्टॉलचे वाटप करण्यात येणार आहे. याची सोडत प्रक्रियादेखील पूर्ण झाली आहे. यासाठीचे काही स्टॉल्स हे घणसोली सेक्टर ४ येथील राजेंद्र आश्रमाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या भूखंडावर पडून आहे. सध्या या ठिकाणी ५६ स्टॅाल आहेत. मात्र, पदपथांवरील धूळ खात पडलेल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे.
-------------------------------------
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने दिव्यांगांना स्टॉल्स जाहीर करण्यात आले आहेत. मात्र, अद्याप त्यांचे वाटप झालेले नाही, याविषयी आयुक्तांसमवेत चर्चा करून स्टॉल्सचे वाटप करण्यात येईल.
- अशोक अहिरे, अधिकारी, मालमत्ता विभाग