
गणेश मंदिर संस्थानच्या स्वागत यात्रेचा रौप्यमहोत्सव
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १५ ः डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थानचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. यावर्षीच्या नववर्ष स्वागतयात्रेनिमित्त संस्थानकडून ‘वसुधैव कुटुंबकम’ संकल्पना घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यावर्षीच्या यात्रेत सहभागी होणार आहेत, अशी माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली.
श्री गणेश मंदिर संस्थानचे हे ९९ वे वर्ष असून ८ मे २०२३ ला शंभराव्या वर्षात संस्थान पदार्पण करणार आहे. डोंबिवलीकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे. तर स्वागत यात्रेचे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. हा अनोखा योग साधून अनेक धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची वर्षभरातील कार्यक्रमाची आखणी मंदिर संस्थानतर्फे केली जात आहे. निसर्ग, पर्यावरण संवर्धन, जल संवर्धन, कचरा मुक्त अभियान, असे सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांबरोबर पंचमहाभुतांची दिंडी, शहरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक संस्थांच्या संकल्पनेतील देखावे चित्ररथाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहेत. नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त यंदा प्रथमच १ ली ते ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी शालेय तसेच आंतरशालेय पाठांतर स्पर्धा, चित्र रंगभरण स्पर्धा, निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. नववर्ष स्वागत यात्रेसाठी वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना अधोरेखित करण्यात आली आहे. डोंबिवली शहरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यक संस्था आणि विविध स्तरातील नागरिक यांचा स्वागत यात्रेत हिरीरीने सहभाग असणार आहे, असे गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्षा अलका मुतालिक यांनी सांगितले.