
भंगार कंत्राटदार, देणगी मागणाऱ्यांवर नजर
ठाणे, ता. १६ (वार्ताहर) : कंपन्यांमधील भंगार विकण्यासाठी दबाव टाकणाऱ्या आणि देणगीसाठी तगादा लावणाऱ्या मंडळींना पोलिसी कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. ठाणे स्मॉल स्कील इंडस्ट्रीजच्या उद्योजकांनी रोजच्या भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा वाचल्यानंतर ठाणे पोलिसांनी त्यांना सुरक्षा कवच देण्याचे कबूल केले. त्यानुसार आता औद्योगिक परिसरात बीट मार्शल आणि पेट्रोलिंगही वाढणार आहे.
ठाणे आयुक्तालयात टीसा उद्योजक संघटनेची औद्योगिक क्षेत्रातील समस्या व इतर विविध मुद्यांवर नुकतीच बैठक पार पडली. यावेळी आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने चेअरमन देवेंद्र सोनी, उपाध्यक्ष भावेश मारू, कार्यकारी सचिव एकनाथ सोनावणे आदी पदाधिकारी आणि ७० च्या आसपास उद्योजकांनी सहभाग घेतला होता. या बैठकीत उद्योजकांनी औद्योगिक क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था, ट्रॅफिक व पार्किंगची समस्या, सी.एम.एस. कंपन्यांतील समस्या, माथाडी कामगारांकडून काम मिळवण्यासाठी होणारा त्रास, भंगाराचे कंत्राट मिळण्यासाठी दबाव आणि देणगीसाठी येणाऱ्या मंडळींची कैफियत मांडली. याशिवाय औद्योगिक क्षेत्रातून स्कूल बस चालवण्यास प्रतिबंध करणे, औद्योगिक क्षेत्रात भरणारे आठवडी बाजार बंद करण्याची मागणी केली.
उद्योजकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर वागळे आणि श्रीनगर पोलिस ठाणे हद्दीतील माथाडी कामगारांची बैठक घेऊन त्यांना सूचना देण्यात येतील, असे आश्वासन वागळे परिमंडळाच्या उपायुक्तांनी दिले. तसेच भंगार विकण्यासाठी त्रास देणाऱ्या लोकांना नोटीस देण्यात येणार असल्याचे सांगितले. कंपन्यांमध्ये बीट मार्शल, पेट्रोलिंगची वाहने वाढवण्यात येणार आहे. सण उत्सवाच्या दरम्यान वर्गणीसाठी कोणी दबाव टाकत असेल, तर त्याच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
हेल्पलाईन वापरा
गुन्हे शाखेचे पोलिस उप आयुक्त शिवराज पाटील यांनी कंपनीच्या गेटवर उच्च प्रतीचे नाईट व्हीजन कॅमेरे लावण्याबाबत सूचना दिल्या. सायबर गुन्ह्यांच्या अनुषंगाने कंपनीमध्ये पोलिस विभागाकडून जनजागृती संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच उद्योजकांनी पोलिस मदतीकरिता ११२ या मदतकेंद्राचा वापर करण्याचे आवाहन केले; तर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त वेरणेकर यांनी औद्योगिक क्षेत्रामध्ये डबल पार्किंग, स्कूल बसच्या वाहतुकीवर कारवाईचे आश्वासन दिले.