
भटक्या कुत्र्याने चावा घेतलेल्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
शहापूर (बातमीदार) : घराजवळ खेळत असताना भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने एका नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना गोठेघर येथे घडली आहे. महिन्याभरापूर्वी कुत्रा चावल्याने आरोही भागरे हिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. तिच्या संपर्कातील नातेवाईकांवरदेखील प्रतिबंधात्मक उपचार सुरू केले आहेत. शहापूरजवळील गोठेघर येथील आरोही भागरे ही मुलगी घराच्या परिसरात साधारण एक महिन्यापूर्वी खेळत असताना तिला भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोहीच्या संपर्कातील तिच्या आई-वडिलांसह दहा जणांवर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात प्रतिबंधात्मक उपचार सुरू करण्यात आले आहेत. गोठेघरचे माजी सरपंच गणेश कामडी यांनी परिसरातील कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शहापूर पंचायत समितीचा पशुसंवर्धन विभाग आणि ग्रामपंचायतीकडे केली आहे.