
उपसरपंच निवडीवरून सरपंचाला मारहाण
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १७ : वाडी ग्रामपंचायतीचे सरपंच तुषार पाटील यांच्यासह त्यांचे बंधू बिपिन पाटील आणि वडील मधुसूदन पाटील यांना भाजपच्या कार्यालयात बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी (ता. १५) घडली आहे. जिल्हा परिषद सदस्य आणि भाजप पदाधिकारी श्याम पाटील यांच्या कार्यालयात मारहाण झाल्याने ग्रामीण भागात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी मारहाण करणाऱ्या पाच जणांवर गुरुवारी (ता. १६) गुन्हा दाखल केला आहे.
मलंगवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडीसाठी बैठक चालू असताना तुषार पाटील आणि श्याम पाटील यांच्यात आपापसांत मतभेद झाले होते. या मतभेदाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले. या वेळी संशयित आरोपी प्रतीक भोलानाथ पाटील, चेतन भोलानाथ पाटील, विकी भोलानाथ पाटील, शिवाजी पाटील आणि सुनील चौधरी यांनी शिवीगाळ करत सरपंच तुषार पाटील यांच्यासह त्यांचे बंधू बिपिन पाटील आणि वडील मधुसूदन पाटील यांना बेदम मारहाण केली. हे प्रकरण अखेर हिललाईन पोलिस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी फिर्यादी तुषार यांची तक्रार घेत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडळी जमवून शिवीगाळ व दमदाटी करून सरपंचासह तिघांना ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली. जिल्हा परिषद सदस्य आणि भाजप पदाधिकारी यांच्या कार्यालयात हा प्रकार घडल्याने याची जोरदार चर्चा सुरू आहे.