
मुंबईत इन्फ्लूएन्झा, कोरोनाचा चढता आलेख
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : केंद्राच्या आरोग्य विभागाने सहा राज्यांना कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर अलर्ट जारी केले आहे. यामध्ये चाचण्यांवर भर देतानाच कोरोना रुग्णांचा वाढता आलेख, रुग्णसंख्येतील वाढीचा ट्रेंड यांसारख्या गोष्टींवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या सहा राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे.
महाराष्ट्रासह मुंबईत इन्फ्लूएन्झानेही शिरकाव केला असून रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका सतर्क झाली असून मुंबईतील १५० खासगी हॉस्पिटलना बेड्स तैनात ठेवा, असे निर्देश पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिले आहेत. खासगी प्रत्येक रुग्णालयात १० ते १५ या प्रमाणे सद्यस्थितीत दीड हजार बेड्स तैनात असून आवश्यकता भासल्यास तेही वाढवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. मागील चार-पाच दिवसांपासून या रुग्णांची दैनंदिन आकडेवारी २५च्या पुढे गेली आहे. कोरोना वाढत असताना आता इन्फ्लूएन्झानेही मुंबईत शिरकाव केला असून तोही झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका सतर्क झाली असून पालिका रुग्णालयात बेड्स तैनात केले आहेत. कोरोना व इन्फ्लूएन्झाचे रुग्ण वाढत असल्याने आयत्यावेळी बेड्स कमी पडू नयेत यासाठी पालिकेने खबरदारी घेतली आहे. नुकतीच पालिका आयुक्तांनी समन्वय समितीसोबत बैठक घेतली. इन्फ्लूएन्झा बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात सध्या १० बेड्स तैनात करण्यात आले असून विशेष वॉर्डही तयार करण्यात आला आहे.
--------
पालिकेकडून आवाहन
इन्फ्लूएन्झाचे रुग्ण वाढत असल्याने खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे ताप, खोकला, सर्दी असल्यास वेळीच तपासणी करा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घ्यावे. तसेच खबरदारी म्हणून गर्दीच्या ठिकाणी तोंडावर मास्क लावावे, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.