
बेकायदा बांधकामाच्या छायाचित्रांचे प्रदर्शन
मानखुर्द, ता. १८ (बातमीदार) : देवनार वसाहतीलगत असलेल्या पालिकेच्या एम पूर्व कार्यालयासमोर बेकायदा बांधकामाच्या छायाचित्रांचे प्रदर्शन शुक्रवारी (ता. १७) दुपारी भरवण्यात आले होते. मनसेच्या महाराष्ट्र चर्मोद्योग कामगार सेनेच्या वतीने हे प्रदर्शन भरवण्यात आले होते. एम पूर्व अंतर्गत असलेल्या परिसरात पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अनेक बेकायदा, अनधिकृत बांधकामे झाली आहेत आणि होत आहेत. अनेक वर्षे पाठपुरावा करूनदेखील त्यांच्याविरोधात कारवाई करण्याऐवजी आर्थिक हितसंबंध जोपासून पाठीशी घालत आहेत. त्यामुळे एम पूर्व विभागात बेकायदा बांधकामाचे सिमेंटचे जंगल निर्माण झाले आहे, असा मनसेचा आरोप आहे. ही बाब एम पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त अलका ससाणे यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी अनधिकृत बांधकामाच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले होते. या वेळी मनसेचे स्थानिक शाखा अध्यक्ष सचिन ससाणे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.