
रिक्षाचालकांचे अविरत सामाजिक कार्य
घाटकोपर : नीलेश मोरे
सीएनजीचे वाढते दर, सातत्याने वाढणारी महागाई, गॅसचे वाढलेले दर अशा आर्थिक कोलमडणाऱ्या परिस्थितीतही घाटकोपरमधील सामान्य रिक्षाचालक कमाईच्या पुंजीतून थोडी रक्कम सामाजिक कार्यासाठी जमा करत सेवा कार्य प्रामाणिकपणे करत आहेत. गगनगिरी महाराज रिक्षाचालक मंडळाचे सदस्य सामाजिक जाणिवेतून रोजच्या रोज रिक्षा व्यवसायातून थोडीशी बचत करून समाजोपयोगी कार्य करत आहेत.
गगनगिरी महाराज रिक्षाचालक मंडळात एकूण ८० सभासद आहेत. मंडळातील काही रिक्षाचालक हे भाड्याच्या घरात राहत असून अनेक जणांची परिस्थिती ही सर्वसामान्य आहे. त्यांनी जगदुषा नगर येथे छोटेखानी मंदिर उभारले असून दिवसा रिक्षा चालवून रात्री तासभर मंदिरात सर्व सभासद एकत्र जमा होत आरती करतात. मंदिराच्या परिसरात रिक्षा पार्किंगमधून येणारे उत्पन्न, तसेच दिवसा काही रक्कम सभासद सामाजिक कार्यासाठी जमा करतात.
१२ वर्षे सलग सामाजिक कार्य सुरू
२००१ मध्ये रिक्षाचालकांनी जय गगनगिरी रिक्षा चालक मंडळाची स्थापना केली. या मंडळात घाटकोपर विभागातून एकूण ८० सभासद आहेत. सध्या मंडळाचे अध्यक्ष नरहरी वायकर; तर सचिव गणेश मेंगडे आहेत. रिक्षाचालक मिळणाऱ्या उत्पन्नातून काही पुंजी सामाजिक कार्यासाठी खर्च करतात. यात वह्या वितरण, रक्तदान शिबिर, आरोग्य सेवा, दिव्यांग व्यक्तींना प्रवास, परीक्षा काळात विद्यार्थी व पालकांना मोफत प्रवास अशी कामे गेली १२ वर्षे आम्ही अविरत करत असल्याचे मंडळाचे खजिनदार विनायक पानसरे यांनी सांगितले.
समाज आणि देशासाठी प्रत्येक नागरिकाचे काही कार्य असते. रिक्षाचालकांचे काम आम्हाला समाधान देते. त्याचे कारण म्हणजे कोणतीही अपेक्षा न बाळगता घरखर्च सांभाळून मिळणाऱ्या पुंजीतून सेवाकार्य सुरू ठेवतो. मंडळातील अनेक रिक्षाचालक सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय असतात.
- हनुमंत टाव्हरे, रिक्षाचालक