मी कुठल्याही देवाचा अवतार नाही- बागेश्वर धाम सरकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मी कुठल्याही देवाचा अवतार नाही- बागेश्वर धाम सरकार
मी कुठल्याही देवाचा अवतार नाही- बागेश्वर धाम सरकार

मी कुठल्याही देवाचा अवतार नाही- बागेश्वर धाम सरकार

sakal_logo
By

कार्यक्रमाला प्रचंड गर्दी

भाईंदर, ता. १८ (बातमीदार) : मी कुठल्याही देवाचा अवतार नाही किंवा मी कुठलाच जादूटोणा अथवा चमत्कार करत नाही; मात्र मी हिंदू धर्मासाठी कार्य करणार असून माझे जीवन समाजासाठी व्यतीत करणार आहे, असे धीरेंद्र कृष्णशास्त्री ऊर्फ बागेश्वर धाम सरकार यांनी मिरा रोड येथे सांगितले. मिरा रोड येथील एस. के. स्टोन परिसरात बागेश्वर धाम सरकार यांच्या दिव्य दर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने भक्तांनी उपस्थिती लावल्याने सुरुवातीला गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. नंतर मात्र कार्यक्रम सुरळीत सुरू झाला. मात्र जमलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरांनी अनेकांचे खिसे कापले.

कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विरोध करून बागेश्वर धाम सरकार यांना अटक करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त ठेवला होता. कार्यक्रमाला झालेल्या प्रचंड गर्दीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान कार्यक्रम सुरू होण्याआधी मिरा रोड पोलिसांनी आयोजकांना नोटीस बजावून कार्यक्रमात समाजात तेढ होणारे तसेच अंधश्रद्धेचा प्रसार होईल, असे वक्तव्य करू नये; अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी समज दिली. कार्यक्रमाला आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन आदी उपस्थित होते. कार्यक्रम रविवारीदेखील सुरू राहणार आहे.


------------
जनहित याचिका फेटाळली
मिरा रोड येथे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या कथित ‘दिव्य दरबार’विरोधात मुंबई उच्च न्यायालयात केलेली जनहित याचिका फेटाळण्यात आली. धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाला पोलिसांनी सशर्त परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका नामंजूर केली. ॲड. नितीन सातपुते यांनी शनिवारी (ता. १८) उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. ‘महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे आणि बुवाबाजी तथा अंधश्रद्धा यांच्यावर विश्वास ठेवत नाही. त्यामुळे असे कार्यक्रम करण्यासाठी मनाई करावी,’ अशी मागणी करण्यात आली होती. तसेच शास्त्री यांच्या दरबारात ‘काळी जादू’ आणि ‘मंत्र तंत्र’ केले जातात, असा आरोप याचिकेत केला आहे. काळी जादू प्रतिबंध कायद्याचा दाखला याचिकेत देण्यात आला असून, अशा प्रकारचे अंधश्रद्धा पसरवणारे कार्यक्रम करण्यासाठी परवानगी देणाऱ्या राज्य सरकारवर कारवाई करण्याची मागणी केली होती.