
परळमध्ये १०१ रक्तदात्या महिलांचा सन्मान
प्रभादेवी (बातमीदार) : ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ हे जाणून मुंबईतील अनेक महिला व मुली स्वच्छेने रक्तदानासाठी आता पुढाकार घेत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत एकाच व्यासपीठावर १०१ रक्तदात्या महिलांचा सन्मान करण्यात आला. रक्तदान क्षेत्रातही महिला आता मागे राहिलेल्या नाहीत. त्यांचा आदर्श समोर ठेवून कुटुंबातील व इतरांनीही रक्तदानासाठी पुढे यावे, हा संदेश समाजात पोचवण्यासाठी प्रथमच ब्लड डोनर मोटिव्हेशन कमिटी आणि शिवशाहू प्रतिष्ठान, मुंबई या संस्थांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. यासाठी लाधू भाई फाऊंडेशन, उद्योजक संदीप बेळगुंदकर यांच्या सहकार्याने १०१ महिला रक्तदात्यांचा सन्मान परळ येथील सोशल सर्व्हिस लीगमध्ये पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. विद्या ठाकूर, अपर्णा पवार, साधना भातखंडे, समाजसेविका अबोली खाड्ये, राजू येरुडकर, बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे जीवन भोसले आणि बाळा पवार उपस्थित होते.