
आमदार आव्हाड यांच्या विरोधात भाजपचे आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : सनातन धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या वतीने सोमवारी आव्हाडांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आले. युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा -मुंब्रा विधानसभा क्षेत्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्माच्याबाबत वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्याचे पडसाद विधिमंडळाच्या अर्थसंकलपीय अधिवेशनातही उमटले. भाजपा आमदारांनी याबाबत सभागृहात जाब ही विचारला. आव्हाड यांच्या या वक्तव्याचा भाजपा ठाणे युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ही निषेध केला. याकरिता युवा मोर्चाचे ठाणे शहर अध्यक्ष सारंग मेढेकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी आव्हाड यांच्या ठाण्यातील घरावर एक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची कुणकुण आधीच ठाणे पोलिसांना लागली होती. परिणामी आव्हाड यांच्या घराकडे जाणाऱ्या मार्गांवर मोठया प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच आव्हाड यांच्या घराकडे जाणारा मार्ग पूर्णता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. दरम्यान सोमवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा मोर्चा आव्हाड यांच्या घराच्या दिशेने आला. या मोर्च्यात सहभागी कार्यकर्त्यांना पोलिसांनी आव्हाड यांच्या घरापासून काही अंतरावरच रोखले. यावेळी या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शहराअध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले होते. या कार्यकर्त्यांनी यावेळी आमदर जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. या आंदोलन करणाऱ्या युवा मोर्चाच्या सुमारे १५ कार्यकर्त्यांना वर्तकनगर पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली.
--------
आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची राष्ट्रवादीची मागणी
आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्माविषयी मांडलेल्या भुमिकेचा निषेध करण्यासाठी भाजपने त्यांच्या बंगल्यावर निदर्शने केली. यावेळी आमदार आव्हाड यांच्या विरोधात अश्लिल घोषणाबाजी करण्यात आली. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हा शाखेने वर्तकनगर पोलिसांना निवेदन देत आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.