
जिल्ह्यात सरासरी १.०० मिमी बरसला अवकाळी पाऊस
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : मंगळवारी सकाळीच ढगांच्या गडगडाटात ठाणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली. अवघ्या तीन तासांत जिल्ह्यात एकूण ७.६० मि.मी. पावसाची नोंद झाली. या वेळी सर्वाधिक ठाणे तालुक्यात १३.४० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. यामुळे वातावरणात सकाळी चांगला गारवा जाणवत होता. ठाणे शहरात सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक ढगांचा गडगडाट होऊन पावसाला सुरुवात झाली. ठाणे शहरात सकाळच्या पहिल्या तीन तासांत म्हणजे सकाळी सहा ते आठ या वाजण्याच्या कालावधीत शहरात ८.१० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मार्च महिन्यात शहरात आतापर्यंत ९.८६ मिमी पाऊस बरसल्याची नोंद झाली आहे. या पावसामुळे शेतकरीवर्गाचे मात्र नुकसान झाले आहे. हा पडलेला अवकाळी पाऊस मात्र पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाप्रमाणे बरसल्याचे दिसून आले. पहिल्या एक तासात ६.१० मिमी; तर त्यानंतरच्या प्रतितासाला प्रत्येकी ०१.०० मिमी पाऊस पडला आहे. सकाळी पाऊस सुरू झाल्याने शाळकरी मुलांसह पालकांची चांगली धावपळ झाली. या अचानक आलेल्या पावसामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी शाळेत न जाता घरी राहणे पसंत केल्याचे दिसून आले.
.................
ठाणे तालुक्यात सर्वाधिक पाऊस
ठाणे जिल्ह्यात एकूण ७.६० पावसाची नोंद झाली. सर्वाधिक १३.४० मिमी पाऊस ठाणे तालुक्यात झाला असून त्यापाठोपाठ भिवंडी १२.००, अंबरनाथ ९.४०, कल्याण ५.१०, शहापूर ११.१०, मुरबाड १.०० मि.मी. पाऊस पडला. मात्र उल्हासनगर तालुक्यात पावसाची नोंद ही ०.० मि.मी. नोंदवली गेली आहे.