मुंबई विद्यापीठ सर्वोत्कृष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई विद्यापीठ सर्वोत्कृष्ट
मुंबई विद्यापीठ सर्वोत्कृष्ट

मुंबई विद्यापीठ सर्वोत्कृष्ट

sakal_logo
By

मुंबई, ता. २२ ः आंतरविद्यापीठीय राष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने सुवर्णपदक पटकावत प्रथम क्रमांक मिळवला आहे. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदकाची कमाई करत विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. भारतीय विद्यापीठ संघातर्फे (एआययू) गुजरात राज्यातील महेसाना येथील गणपत विद्यापीठात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेसाठी विद्यापीठामार्फत सामाजिक शास्त्रे, मानव्य विज्ञान, वाणिज्य, व्यवस्थापन, मूलभूत शास्त्रे, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, शेती आणि वैद्यक शास्त्रे या पाच वर्गवारीतून सादरीकरण करण्यात आले. यामध्ये विद्यापीठास संपूर्ण वर्गवारीतून सुवर्णपदक; तर सामाजिक शास्त्रे, मानव्य विज्ञान आणि व्यवस्थापन या वर्गवारीत सुवर्णपदक, वैद्यक शास्त्रात सुवर्णपदक; तर अभियांत्रिकी वर्गवारीत रौप्यपदक मिळाले आहे. संकेत शिरोडकर या विद्यार्थ्यास वैद्यकशास्त्र वर्गवारीत सुवर्णपदक, सामाजिक शास्त्रे या वर्गवारीतून स्वराज मिश्रा यास सुवर्णपदक; तर अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान या वर्गवारीतून विशाल पेडणेकर, निधी शेट्टीगर आणि सायली ठवरे या विद्यार्थ्यांना रौप्यपदक मिळाले आहे.

विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. दिगंबर शिर्के, प्रभारी प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि वित्त व लेखा अधिकारी प्रा. प्रदीप कामथेकर यांनी विजयी चमूचे अभिनंदन केले. विद्यार्थी विकास विभागाच्या मार्गदर्शनार्थ या स्पर्धेसाठी विशेष कार्य अधिकारी म्हणून डॉ. मीनाक्षी गुरव, संघ व्यवस्थापक म्हणून डॉ. भूषण लांगी आणि डॉ. रूपा राव यांनी काम पाहिले; तर मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. शशिकुमार मेनन, प्रा. डॉ. सुनीता शैलजन, डॉ. मीनाक्षी गुरव, डॉ. भूषण लांगी, डॉ. रूपा राव आणि डॉ. मनीष देशमुख यांनी काम पाहिले.
----
संशोधनाच्या क्षेत्रात मुंबई विद्यापीठाने सातत्याने केलेल्या या नेत्रदीपक कामगिरीमुळे आज राष्ट्रीय स्तरावर मुंबई विद्यापीठाचा नावलौकिक होतो आहे. हे कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी संशोधन, नावीण्य आणि कल्पकतेच्या जोरावर अन्वेषणसारख्या संशोधन स्पर्धेतील यशाने विद्यापीठाला एक वेगळी उंची मिळवून दिली आहे.
- प्रा. दिगंबर शिर्के, प्रभारी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ