
कार्यात सातत्य राखू
वडाळा, ता. २२ (बातमीदार) ः कामगार आणि सामान्यांच्या जीवनाशी नाळ जोडून राहिल्याने विधान परिषदेत अनेकविध प्रश्नांवर झगडताना नवी उमेद आणि जिद्द मिळत गेली. तेव्हा काही जरी झाले तरी आपण या कार्यात शेवटपर्यंत सातत्य राखू, अशी ग्वाही राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष, आमदार सचिन अहिर यांनी दिली. राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (ता. २१) आमदार सचिन अहिर यांचा ५१ वा वाढदिवस परळ पूर्व येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या मजदूर मंझीलमधील महात्मा गांधी सभागृहात झाला, त्या वेळी अहिर बोलत होते.
प्रारंभी संघटनेचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी सचिन अहिर यांना शौर्याचे प्रतीक म्हणून ना. स. इनामदार लिखित ‘राजेश्री’ हा छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र सांगणारा ग्रंथ भेट म्हणून दिला. या वेळी सचिन अहिर यांच्या पत्नी संकल्प प्रतिष्ठानच्या संचालिका संगीता अहिर उपस्थित होत्या. राजकारणापलिकडे आपण आपले स्नेहबंध जोपासले आहेत. त्याची बहुदा ही पोचपावती असावी. अडचणीच्या काळात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कशी वाढेल, याला आपले सर्वात अधिक प्राधान्य असेल आणि ती आपली नैतिक जबाबदारीही रहाणार आहे. अन्यायग्रस्त कामगार आणि गरजू सामान्य माणसाला न्याय मिळवून देणे, आपले अंतिम ध्येय आपण मानले आहे, असे सचिन अहिर या वेळी म्हणाले.
दरम्यान, भारतीय कामगार सेना चिटणीस राम साळगावकर, आशिष चेंबूरकर, मुंबई बॅंकेचे विठ्ठलराव भोसले, संघटनेचे खजिनदार निवृत्ती देसाई, युनियन प्रतिनिधी प्रकाश म्हात्रे, प्रियांका जोशी, महाराष्ट्र इंटकचे नवनिर्वाचित अध्यक्ष कैलास कदम आदींनी आपल्या भाषणात अहिर यांच्या कार्याच्या विविध पैलूंवर प्रकाशझोत टाकला. या वेळी माजी नगरसेवक रमाकांत रहाटे, उपाध्यक्ष रघुनाथ शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे तसेच राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे उपाध्यक्ष राजन लाड, माजी नगरसेवक सुनील अहिर, विजय काळोखे, उत्तम गिते, मिलिंद तांबडे, किशोर रहाटे, साई निकम, इंटकचे दिवाकर दळवी, मुकेश तिबुटे आदी उपस्थित होते.
---------------
सामाजिक उपक्रमांचे आयोजन
जी. डी. आंबेकर कॅटरिंग कॉलेजचे संचालक जी. बी. गावडे, विलास डांगे यांच्या पुढाकाराने प्रथम पारंपरिक पद्धतीने अहिर यांचे अभीष्टचिंतन पार पडले. युनियन पदाधिकारी बाळा सावडावकर यांच्या प्रयत्नातून ज्येष्ठ नागरिकांना खुल्या बसमधून मुंबई दर्शन घडवण्यात आले; तर चेअरमन संजीव सिंघल, सेक्रेटरी दीपक यादव आदींच्या प्रयत्नाने डॉकयार्ड एम्प्लॉइज युनियन, माझगाव यांच्या वतीने रक्तदान शिबिर, आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या तर्फे सचिन अहिर चषकासाठी क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या.